पाणी पुरवठ्याचे काम वेगात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठ्याचे काम वेगात करा
पाणी पुरवठ्याचे काम वेगात करा

पाणी पुरवठ्याचे काम वेगात करा

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : वारजे जलशुद्धीकरण केंद्रात होणाऱ्या वारंवार बिघाडाचा फटका बाणेर, बालेवाडी भागाला बसत आहे. महापालिकेकडून सुधारणा केल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी कामाची गती संथ असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बालेवाडी या दरम्यान टाकल्या जाणाऱ्या जलवाहिनीचे उर्वरित २ किलोमीटरचे काम लवकर पूर्ण करा, पंपिंगच्या मोटारींची संख्या वाढावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिल्या.

विधानभवन येथे चंद्रकांत पाटील यांनी बालेवाडी, बाणेर भागातील पाणी प्रश्‍नावर बैठक घेतली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यावेळी उपस्थित होते.
वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळित होत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या भागाला पाणी उशिराने व कमी पाणी मिळत आहे. यावर बैठकीत चर्चा झाली.
महापालिकेतर्फे या भागासाठी ४६ एमएलडी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. वारजे ते बालेवाडी या दरम्यान १८. ९४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, त्यापैकी १६.७२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील पंप जुने आणि खराब झालेले आहेत. त्या पंपाच्या जागी बदलून त्याजागी वाढीव क्षमतेचे नवीन पंप बसविण्यात येणार आहेत. बालेवाडी येथे तीन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार आहे. निकडीच्या काळात हे पाणी वापरणे शक्य होणार आहे, असे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर पाटील यांनी हे काम लवकर पूर्ण करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी वेगात कामे पूर्ण करा, असे आदेश दिले.

सिंहगड रस्त्यावर आमदारांसह पाहणी

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वडगाव येथून येणाऱ्या नागरिकांना उजवीकडे वळण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे, अन्यथा मोठा वळसा घालावा लागेल यासाठी आमदार भीमराव तापकीर यांनी भुयारी मार्गाची मागणी केली आहे. पण तेथे जागा कमी असल्याने प्रशासनाने नकार दिला आहे. या प्रश्‍नावर काही दिवसांपूर्वी पाटील यांनी बैठकीत चर्चा केली होती. पण त्यात आमदार माधुरी मिसाळ यांनी विरोध केल्याने वाद झाला होता. गुरुवारी पाटील यांनी या विषयावर पुन्हा एक बैठक घेतली. त्यामध्ये तापकीर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. वडगावच्या नागरिकांसाठी कसा पर्याय देता येऊ शकतो हे तपासण्यासाठी आमदार तापकीर, महापालिकेचे अधिकारी व त्रयस्थ तज्ज्ञ यांच्यामार्फत पाहणी करून अहवाल सादर करा, असे आदेश पाटील यांनी दिले.