सेवाभरतीसाठी अद्ययावत नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवाभरतीसाठी अद्ययावत नियमावली
सेवाभरतीसाठी अद्ययावत नियमावली

सेवाभरतीसाठी अद्ययावत नियमावली

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः पुणे महापालिकेत सेवकभरती करताना कालानुरूप बदललेले उत्तम दर्जाचे शिक्षण घेतलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड व्हावी, या ज्ञानाचा, कौशल्याचा वापर महापालिकेच्या सेवेतून नागरिकांना व्हावा यादृष्टीने सेवाभरती प्रवेश नियमावली अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रत्येक विभाग प्रमुखाने त्यांच्या विभागाशी संबंधित पद भरती, त्यासाठीचे निकष याची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भरती व प्रक्रिया
- पुणे महापालिकेत निर्णय घेण्यासाठी, धोरण तयार करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे
- लोकप्रतिनिधींचा कालावधी संपला तरी प्रशासकाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात
- पुणे महापालिकेत नोकरभरती करण्यासाठीचा निर्णय हा प्रशासनासह राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा असतो
- यंदाच्या वर्षी ४४८ पदांची भरती ही पूर्णपणे प्रशासकाच्या काळात पूर्ण झाल्याने त्याचे श्रेय लोकप्रतिनिधींना घेता आलेला नाही
- ही भरती पूर्ण झाल्यानंतर आता आखणी २०० पदांची भरती करण्याचे नियोजन
- त्याची प्रक्रिया २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे

का हवा बदल?
- पुणे महापालिकडून २०१४ मध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली तयार
- त्यास महापालिकेच्या मुख्यसभेसह सरकारच्या नगरविकास विभागाकडून मंजुरी
- पण त्यानंतर पदभरती होऊ शकली नाही
- या नव्या नियमावलीनुसार यंदा पहिलीच भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे
- साधारणपणे पाच वर्षांनंतर सेवा प्रवेश नियमावलीचा आढावा घेऊन त्यात बदल करणे गरजेचे असते

कशाचा विचार हवा?
महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत प्रशासकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, तांत्रिक सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा, कायदे सेवा या प्रकारानुसार पदभरती केली जाते. यामुळे आवश्‍यकतेनुसार या प्रकारात नवीन पदे निर्माण होऊ शकतात किंवा काही पदे कमी ही होऊ शकतात. शैक्षणिक पात्रता, त्याचसोबत कामाचा अनुभव, उमेदवाराकडे आवश्‍यक कौशल्य याचाही विचार करून चांगले नियम तयार करता येणे शक्य आहे.

इतर महापालिकांचाही आढावा
राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये भरती प्रक्रियेचे, पदोन्नतीचे नियम भिन्न आहेत. तसेच शैक्षणिक पात्रताही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे महापालिकेची नियमावली अद्ययावत करताना मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, ठाणे यासह इतर ठिकाणच्या महापालिकांच्या निकषांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता कमी आहे, ती वाढवता येईल किंवा इतर बदल करणे शक्य होणार आहे.

बदलाची प्रक्रिया मोठी
प्रशासनाने सेवा प्रवेश नियमावली अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांना पुढील आठवड्यात माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती आल्यानंतर त्याची पडताळणी करणे, कायदेशीर बाबी तपासून पाहणे, त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर करून घेऊन सरकारकडे पाठवावा लागेल. तेथे मान्यता मिळाल्यानंतर नवीन नियमानुसार भरती करता येईल.

महापालिकेची सेवा भरती प्रवेश नियमावली २०१४ मध्ये तयार झाली आहे. गेल्या आठ वर्षामध्ये त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने ही नियमावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये काळानुरूप काही पदे कमी होतील, काही वाढतील, शैक्षणिक पात्रता, पदोन्नतीचे पद किती, थेट भरतीचे किती

याचाही विचार केला जाईल. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच अवधी लागेल. तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार भरती प्रक्रिया राबविली जाईल.
- सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

पुणे महापालिकेसाठी मंजूर पदे
विभाग संख्या ५८
एकूण कर्मचारी २३५३३
वर्ग चार - १५१७२
वर्ग तीन - ७२५७
वर्ग दोन - ८०२
वर्ग एक - ३०२