प्रवाशांनी रेल्वे पावणेदोन तास रोखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशांनी रेल्वे पावणेदोन तास रोखली
प्रवाशांनी रेल्वे पावणेदोन तास रोखली

प्रवाशांनी रेल्वे पावणेदोन तास रोखली

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः आरक्षित व अनारक्षित डब्यांत प्रवाशांची तुडूंब गर्दी झाल्याने डब्यातील प्रवाशांनी पुणे स्थानक आल्यावर डब्याचे दरवाजे आतून उघडलेच नाही. त्यामुळे पुणे स्थानकावरच्या प्रवाशांना डब्यांत प्रवेश करता आले नाही. तेव्हा चिडलेल्या प्रवाशांनी रेल्वे निघताच पळत जाऊन ट्रकवरच उभे राहिले. त्यामुळे चालकाला रेल्वे थांबवावी लागली. डब्यांत चढू न शकणाऱ्या प्रवाशांनी सुमारे एक तास ४० मिनिटे रेल्वे थांबवून ठेवली. अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे दौंडच्या दिशेने निघाली.
घटनेची माहिती आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. तसेच नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, आरपीएफचे सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार आदी स्थानकावर दाखल झाले. त्यांनी काही प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेतून जाण्यास परवानगी दिली. तर ६७ प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम परत दिली. त्यानंतर पहाटे दोन वाजून ४८ मिनिटांनी रेल्वे मार्गस्थ झाली.

नेमके काय झाले?
- मुंबई-बिदर एक्स्प्रेस मुंबईहून निघतानाच कुर्डुवाडी, लातूर जाणाऱ्या प्रवाशांनी भरून गेली
- अनेक अनारक्षित तिकीटधारक आरक्षित डब्यांत घुसले
- त्यामुळे आरक्षित व अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गर्दी झाली
- पिंपरी स्थानकावर देखील अशीच परिस्थिती
- पुणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर रविवारी पहाटे एक वाजून आठ मिनिटांनी बिदर एक्स्प्रेस दाखल
- रेल्वेने प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दोनशे
- फलाटावर दाखल झालेल्या डब्याचे दरवाजे उघडत नसल्याने प्रवाशांकडून गोंधळ घालण्यास सुरवात
- डब्यांत प्रवेश करता येत नसल्याने प्रवासी आक्रमक
- रेल्वेला सिग्नल मिळताच सुमारे शंभर प्रवासी रेल्वे थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रकवर उभे
- तेव्हा चालकाने रेल्वे थांबवली

घटनाक्रम
- शनिवारी मध्यरात्री एक वाजून आठ मिनिटांनी पुणे स्थानकावर दाखल
- एक वाजून १५ मिनिटांनी रेल्वेला ग्रीन सिग्नल
- एक एक वाजून १६ मिनिटांनी रेल्वे फलाट सोडून पुढे जाण्यास निघाली. त्याच वेळी प्रवासी पळत जाऊन ट्रकवर उभे राहिले.
ट्रॅकवर माणसे दिसताच रेल्वे थांबली.
- दोन वाजून ४८ मिनिटांनी रेल्वे पुन्हा मार्गस्थ

मुंबई-बिदर एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी होती. काही प्रवाशांनी डब्यांत आणखी गर्दी होऊ नये म्हणून डब्याचा दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे थांबवली. अशा प्रवाशांची सोय दुसऱ्या रेल्वेत केली तर काहींनी प्रवास करण्याचे टाळले. त्यांना तिकिटाची पूर्ण रक्कम देण्यात आली.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे