जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा ढकलावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा ढकलावी
जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा ढकलावी

जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा ढकलावी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : देशभरातील एनआयटी, आयआयआयटी (ट्रिपलआयटी) यांसह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमातील (बी.ई. आणि बी.टेक) प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा आणि अनेक राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेची प्रात्यक्षिक आणि प्रिलियम परीक्षा एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या जानेवारी सत्रातील जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार २४, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२३ दरम्यान पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रासंदर्भात माहिती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एनटीएमार्फत जाहीर केली जाणार आहे. दरम्यान या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सोशल मिडियावर विविध विद्यार्थी-पालक संघटनांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरल्याचे दिसून येते. ट्विटर आणि फेसबुक अशा विविध माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. याची दखल घेऊन इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘बारावीच्या परीक्षेनंतर ही परीक्षा घेण्यात यावी’, अशी मागणी या पत्राद्वारे पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रिलियम यांच्यासह, आयसीएसई, बिहार राज्य, आसाम राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा आणि जानेवारीत होणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा कालावधी एकाच वेळेस येत आहेत. त्यामुळे या मंडळांच्या लाखो विद्यार्थ्यांना जानेवारीत होणाऱ्या जेईई मेन परीक्षेपासून लांब राहावे लागण्याची शक्यता आहे किंवा अति ताणात या दोन्ही परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सोशल मिडियाद्वारे होत आहे.


‘‘देशातील विविध मंडळांमध्ये आणि अनेक राज्य मंडळांमधील बारावीच्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा, प्रिलियम आणि जेईई मेन परीक्षा जानेवारीत होत आहेत. तसेच फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच काही राज्यांमधील बारावीच्या परीक्षा सुरू होतात. परिणामी हजारो विद्यार्थ्यांना जानेवारीत होणारी जेईई मेन परीक्षा देणे शक्य होणार नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
- अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशन