
ग्रामपंचायतींसाठी ८०.८६ टक्के मतदान
पुणे, ता. १८ ः पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता १७६ ग्रामपंचायत साठी रविवार (ता. १८) मतदान झाले. काही तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये तुरळक वादविवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये एकूण तीन लाख तीन हजार २१३ मतदारांपैकी दोन लाख ४५ हजार १९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिशय चुरशीने झालेले या निवडणुकांमध्ये एकूण ८०.८६ टक्के मतदान झाले.
पुणे जिल्ह्यातील डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतीची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने त्या गावचे सरपंचपद रिक्तच राहणार आहे. १६७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी व एकूण १७६ ग्रामपंचायतीसाठी ६५१ मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १८५३ सदस्य पदाच्या जागांपैकी ७१२ जागा बिनविरोध झाल्या तर ७९ सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही. यामुळे उर्वरित १०६२ जागांसाठी मतदान झाले.
ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडाला होता. दिवस रात्र एक करून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे ऐन गुलाबी थंडीत राजकारण तापले होते. ते आता निकालापर्यंत शांत झाले आहे.