महोत्सवाचा आनंद, मैफल संपल्याची हुरहूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महोत्सवाचा आनंद, मैफल संपल्याची हुरहूर
महोत्सवाचा आनंद, मैफल संपल्याची हुरहूर

महोत्सवाचा आनंद, मैफल संपल्याची हुरहूर

sakal_logo
By

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची दमदार सुरवात पं. आनंद भाटे यांच्या वृंदावनी सारंग रागाने झाली. गुरू पं. भीमसेनजींच्या ‘तुम रब तुम साहेब’ व ‘जाऊँ मैं तोपे बलिहारी’ या दोन प्रसिद्ध बंदिशी त्यांनी सादरीकरणासाठी निवडल्या. विलंबित तीन ताल किंवा एकतालाऐवेजी झपताल, रूपक सारख्या तालांमध्ये ख्याल गायची पद्धत काळानुरुप रूढ होऊ लागली आहे. मर्यादितवेळ या बदलामागे कारणीभूत असावा. पं. आनंद भाटेंनी देखील सादरीकरणासाठी झपताल निवडला. आकर्षक स्वरावली, आकारयुक्त गायकी व बंदिशीतल्या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी सारंग उत्तम प्रकारे मांडला. पल्लेदार आणि दाणेदार तानांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. भरत कामत व सुयोग कुंडलकर यांच्या साथीने सादरीकरण अधिक रंगले. सवाईच्या मंचावरून श्रोत्यांना अजून नाट्यगीताचाआनंद मिळालेला नव्हता, तो पं. आनंद भाटेंनी दिला. ‘रामरंगी रंगले मन’ ही रचना सादर करून त्यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली. ‘बाजे मुरलीया’ ही रचना आजच्याही सत्रात परत सादर झाली. प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणातून तीच रचना वेगळी जाणवली. लोकाग्रहास्तव ‘युवती मना’ या नाट्यगीताने त्यांनी मैफलीचा समारोप केला.

संगीत शास्त्रानुसार वेगवेगळे राग, त्यांच्या सादरीकरणाच्या वेळा आणि मैफलीच्या वेळा याचे गणित जमत नसल्याने राग अल्हैया बिलावल हा राग कमी प्रमाणात गायला वाजवला जातो असं सांगत बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरी वादक राजेंद्र प्रसन्ना यांनी वादनातून श्रोत्यांसमोर बिलावल राग पेश केला. गायकी अंगाने बढत करत त्यांनी आपले सादरीकरण केले. राजेश व ऋषभ प्रसन्ना यांच्या सहवादनाने सादरीकरणात भरीवपणा आला. मध्य व द्रुत लयीत रवींद्र यावगल यांची साथ अतिशय भावली. तबला व गायन जुगलबंदी, किंवा सवाल-जवाब करण्याचा अट्टहास दोन्ही कलाकारांनी केला नाही. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने राजेंद्र यांनी वादनाचा समारोप केला.


‘सरगम’ गायन
राजेंद्र कंदलगावकर यांनी पुढच्या सत्राची सुरूवात भीमपलास रागाने केली. रागाची बंदिश केंद्रस्थानी मानून शब्दांच्या सहाय्या नेत्यांनी उत्तम राग मांडणी केली. आजकाल आलापीमध्ये ‘सरगम’ गायनाची पद्धत रूढ झालेली आहे. गायकी आकर्षक करण्यामध्ये सरगमला निश्चितच श्रेय आहे. उपशास्त्रीय प्रकारामध्ये पिलू रागातली ठुमरी त्यांनी गायली व पं. भीमसेन जोशींनी गायलेल्या ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या सुप्रसिद्ध अभंगाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. संवादिनीची साथ करताना उमेश पुरोहित यांनी स्वरांचा सुंदर मागोवा घेतला. पं. रामदास पळसुले यांच्या साथीने कायमच सादरीकरण अधिक उठावदार होते, तसे झाले. हर्षद डोंगरे व रवी फडके यांची स्वरसाथ पूरक ठरली.


महेश काळे, संदीप नारायण यांची जुगलबंदी
सुप्रसिद्ध गायक महेश काळे व संदीप नारायण यांच्या जुगलबंदीने पुढच्या सत्राची सुरूवात झाली. शास्त्रीय संगीताची, नवीन पिढीमध्ये रुची निर्माण करणाऱ्यांमध्ये महेश काळे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे नवीन पिढीतली अनेक मुलं शास्त्रीय संगीत ऐकू व शिकू लागली आहेत यात शंका नाही. सवाईच्या मंचावर देखील अनेक श्रोत्यांना त्यांचे गाणे ऐकण्याची उत्कंठा होती. सलग दुसऱ्या दिवशी श्रोत्यांनी कर्नाटकी संगीताचा मनसोक्त आस्वाद घेतला. सादरीकरणाचा वेळ कमी झाल्याने ख्याल सुरू करण्यापूर्वी आलापी करण्याची पद्धत जवळजवळ बंद झाली आहे, पण या द्वयींनी मनसोक्त स्वर विस्तार करून धानी रागाचा माहोल तयार केला. धानी हा राग कर्नाटक संगीतात सुद्ध धनासी या नावाने ओळखला जातो. कालच्या सत्रातल्या रागम, तानम, पल्लवीया प्रकारापासून भिन्न, गायकी अंगाचं प्रदर्शन संदीप यांनी केलं. दोन वेगळ्या शैली ऐकताना सादरीकरणात नावीन्य जाणवत होतं, त्यात कल्पकता होती तरी देखील, चार ताल वाद्य एकत्र वाजली की त्यातला गोडवा थोडा कमी व्हायची शक्यता असते. ह्रिदमला आलेलं महत्त्व आणि चढी लय, हिंदुस्तानी रागसंगीतात काळानुरूप होणाऱ्या बदलाची नांदी असावी. महेश यांच्या बरोबर तीनतानपुरे, तबला (विभव खांडोळकर), संवादिनी (राजीव तांबे), पखवाज (ओंकार दळवी), तालवाद्य (अपूर्व द्रविड) तर संदीप यांच्याबरोबर व्हायोलिन (व्ही.व्ही.एस.मुरारी), घटम (चंद्रशेखर शर्मा), मृदंगम (साई गिरिधर) असे अनेक संगतकार मंचावर उपस्थित होते. वाद्यांचा ताफा जास्त असला की मायक्रो फोनमधला आवाज बॅलन्स करणं, हे देखील जिकीरीचं काम होऊन बसतं. वाढलेल्या आवाजामुळे शास्त्रीय संगीताची मैफल न वाटता तो एक
इव्हेंट असल्याचा भास होतो. असे असूनही आपल्या सादरीकरणातून दोन्ही कलाकारांनी पुणेकरांना चकित करून सोडलं व त्या परफॉरमन्सला मायबाप रसिकांनी शिट्ट्या व टाळ्यांच्या रूपात भरघोस प्रतिसाद दिला. या तरुण कलाकारांना प्रेक्षकांची नाळ बरोबर सापडली आहे, असे म्हणायला हरकत नाही.


शास्त्रीय नृत्याविष्कार
शास्त्र आलं की क्लिष्ट, असा गैरसमज सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात असतो; पण प्रसिद्ध नृत्यांगना अर्चना जोगळेकर यांचा शास्त्रीय नृत्याविष्कार बघताना हा समज चुकीचा ठरला. श्रीराम स्तुती, धमार, स्वरचित रचना, गतभाव सारखे नृत्य प्रकार त्यांनी अतिशय तयारीने आणि रसिकांना खिळवून ठेवतील अशा पद्धतीने सादर केले. रोजच्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांवर सादर केलेला त्यांचा गतभाव बघताना प्रत्येक श्रोता त्यांच्या अभिनयात बुडून गेला. साहित्याचा व संगीताचा आधार न घेता, केवळ ठेक्यावर अभिनय सादर करणं अत्यंत अवघड आहे. अभिनयातून रसिकांना आपल्या बरोबर दुसऱ्या विश्वात घेऊन जाण्यात त्यांची हातोटी दिसली. प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य अफाट होतं. नृत्याच्यामध्ये संवाद साधताना त्यांना दम लागला असेल अशी शंकाही येत नव्हती. सच्ची कलाकृती कायमच मनाला भिडते तशी अर्चना यांच्या प्रत्येक सादरीकरणाने डोळ्याच्या कडा ओलावत होत्या. त्यांना झुबेर शेख-सतार, भवन ढकन-बासरी, व वैभव कृष्ण, आर्य दंडवते यांची पढंत होती. वैभव मांकड यांची गायन साथ पूरक होती.

आवाजातला गोडवा अजूनही टिकून
पाच दिवसीय महोत्सवाची सांगता स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने झाली. ९० वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्या आवाजातला गोडवा अजूनही टिकून आहे, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते. ‘या वयात शरीराची आणि मनाची काय अवस्था असते हे त्यावयात गेल्यावरच कळते. श्रोत्यांमध्ये देखील कुणी माझ्या वयाचं नसेल’, असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. संगीत हे केवळ शास्त्र नाही, करामत आणि मनोरंजन देखील नाही. तो आनंद देणारा खळखळता झरा आहे. एक जबाबदार कलाकार म्हणून मी संगीताचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. काळानुरूप संगीतात बदल होणार, आणि ते होणं अपेक्षितच आहे. या बदलांची जबाबदारी जशी कलाकारांची आहे, तशी श्रोत्यांची देखील आहे असं सांगत त्यांनी भैरवी रागात सादरीकरण केले. वयानुरूप आवाज फार साथ देत नसला तरी त्यांची सांगितीक कारकीर्द, त्यांचं योगदान लक्षात घेता त्या मांडत असलेला प्रत्येक सांगितीक विचार बरंच काही देऊन जात होता. वयाच्या या टप्प्यावर आवाज हे माध्यम फार महत्त्वाचं रहात नाही. त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार त्यांच्या शिष्या आरती कुंडलकर, अश्विनी मोडक व डॉ. चेतना बनावत पुढे नेत होत्या. त्यांना तबल्याची साथ ज्येष्ठ तबला वादक माधव मोडक तर संवादिनीची संगत सुयोग कुंडलकर यांनी केली. दरवर्षीप्रमाणे महोत्सवाची सांगता सवाई गंधर्व यांच्या आवाजातील भैरवीतील रेकॉर्डने झाली. संपूर्ण महोत्सवाचा आनंद, मैफल संपल्याची हुरहूर व पुढच्या महोत्सवाची उत्कंठा बाळगून रसिक प्रेक्षक परतले.