चालकांचा ओव्हर टाइम पुणे महापालिकेने घटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकांचा ओव्हर टाइम
पुणे महापालिकेने घटवला
चालकांचा ओव्हर टाइम पुणे महापालिकेने घटवला

चालकांचा ओव्हर टाइम पुणे महापालिकेने घटवला

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : पुणे महापालिकेच्या वाहनचालकांनी कितीही ओव्हर टाइम केला तर त्यांना आता प्रत्येक महिन्याला ५० तासपर्यंतचाच ओव्हर टाइम देण्यात येणार आहे. पूर्वी ७५ तासांचे पैसे दिले जात होते. स्थायी समितीने हा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना वाहन व्यवस्था पुरविली जाते. अधिकाऱ्यांच्या शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका, जागा पाहणीसाठी जातात. तसेच रात्रीच्या वेळीही कामाच्या ठिकाणी जावे लागते. त्यावेळी वाहनचालक सोबत असतात. तसेच अधिकाऱ्यांना घरपोच सेवा असल्याने सकाळी त्यांना त्यांच्या घरी वेळेत पोचावे लागते व रात्री काम संपवून त्यांना घरी सोडल्याशिवाय चालकांची ड्यूटी संपत नाही. सध्या महापालिकेत नगरसेवक नसले तरी पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर काम करणाऱ्या चालकांनाही आठ तासापेक्षा जास्त काम करावे लागते.
महापालिकेकडे वाहन चालकांच्या ९५१ मान्य जागा असून, त्यापैकी ४२८ चालक आहेत, तर ५३३ जागा रिक्त आहेत. तसेच मोटर वाहन विभागात वाहन चालकासह, जेसीबी ऑपरेटर, वाहन चालक प्रमुख आदी कर्मचाऱ्यांना जास्त वेळ काम करावे लागते. सातव्या वेतन आयोगामुळे पगार वाढल्याने ओव्हर टाइम कमी करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात वाहनचालक प्रत्येक महिन्याला ८० पेक्षा जास्त तासांचा ओव्हर टाइम करतात. सहाव्या वेतन आयोगानुसार ७५ तासाचा ओव्हर टाइम पकडून त्याचे पैसे मिळत होते. पण आता ओव्हर टाइमचे २५ तास कमी केले आहेत. चालकांना यापुढे ५० तासपर्यंतच्याच ओव्हर टाइमचे पैसे दिले जाणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे.