शुक्‍ला यांच्याविरुद्धचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुक्‍ला यांच्याविरुद्धचा  
क्लोजर रिपोर्ट फेटाळला
शुक्‍ला यांच्याविरुद्धचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला

शुक्‍ला यांच्याविरुद्धचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : राजकीय व्यक्तींचे फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपींग केल्याप्रकरणी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्‍ह्यात पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्‍लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू होता. या प्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्‍लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्‍ला या पोलिस आयुक्‍त असताना त्‍यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता. यावेळी चौकशी दरम्‍यान गुन्‍हे शाखेने फोन टॅपींग कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणत्या स्वरूपाची माहिती गोळा केली या आणि अशा स्वरूपाची माहिती यावेळी घेण्यात आली याबाबतही चौकशी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?
रश्‍मी शुक्‍ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदा टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला होता. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही पदाचा गैरवापर करून बेकायदा अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे अहवालात म्हटले होते.

नावांसाठी कोडनेमचा वापर
नेत्यांचे फोन टॅप करताना त्यांच्या नावांसाठी कोडनेम वापरण्यात आले होते. या सर्वांना अमली पदार्थ तस्कर म्हणून दाखवण्यात आले होते.

नेता अन् कोडनेम
नाना पटोले - अमजद खान
बच्चू कडू - निजामुद्दीन बाबू शेख
संजय काकडे - अभिजित नायर
आशिष देशमुख - महेश साळुंके