भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सून, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक (वय ५७) यांचे प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्यामागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्राली टिळक, सून, जावई असा परिवार आहे.
टिळक यांचे पार्थिव शुक्रवारी (ता. २३) सकाळी ९ ते ११ टिळक वाडा येथे राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी ११.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे.
मुक्ता टिळक या २००२, २००७, २०१२ आणि २०१७ अशा सलग चार वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून गेल्या. २०११-१२ मध्ये त्या महापालिकेत भाजपच्या गटनेत्या होत्या. २०१७ मध्ये महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर अनेकांची नावे महापौरपदासाठी इच्छुक होती. पण पक्षाने टिळक यांना या पदावर संधी देऊन टिळक घराण्याचे राजकारणातील महत्त्व अधोरेखित केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने टिळक यांना उमेदवारी देत विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
एकीकडे राजकीय जबाबदारी पार पाडत असताना टिळक यांना कर्करोगाचे निदान झाले. तरीही त्यांनी हिंमत न हारता मतदारसंघातील कामे सुरूच ठेवली. शक्य तेवढ्या प्रमाणात नागरिकांच्या गाठीभेटी, सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती.
त्यांच्या कारकिर्दीत नानावाडा येथे क्रांतिकारक संग्रहालय, कचरा प्रकल्प उभारणे, महापालिकेच्या शाळांमध्ये विज्ञान व संगणक प्रयोगशाळांची निर्मिती, जुन्या झालेल्या पोलिस चौक्यांचे नूतनीकरण केले. तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद असावी, यासाठी जेंडर बजेटची तरतूद मांडली. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांसाठी उपक्रम राबविले.
टिळक यांनी शालेय शिक्षण सौ. विमलाबाई गरवारे विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतले. जर्मन भाषा, एमबीए मार्केटिंग, पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

आजारी असतानाही खास मतदानासाठी मुंबईला
२० जून २०२२ ला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होते. या निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार उभे असल्याने प्रत्येक मताला महत्त्व होते. त्या वेळी प्रकृती चांगली नसतानाही त्यांनी पक्षाला माझी गरज आहे, असे सांगत पुण्यावरून मुंबईला जाऊन मतदान केले होते. त्यांच्या या पक्षनिष्ठेबद्दल सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते.