तापमानातील चढ-उतार कायम राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापमानातील चढ-उतार कायम राहणार
तापमानातील चढ-उतार कायम राहणार

तापमानातील चढ-उतार कायम राहणार

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : पुणे शहरातील किमान तापमानातील चढ-उतार सातत्याने कायम आहे. पुढील आठवडाभर शहरात ही स्थिती अशीच पाहायला मिळणार असून त्यामुळे गारठा कमी होऊ शकतो. शुक्रवारी (ता. २३) शहर व परिसरात निरभ्र आकाश आणि पहाटे धुके पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी (ता. २२) शहरात १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत तापमानात किंचित वाढ झाली. सध्या किमान तापमान हे सरासरीच्या जवळपास असले तरी गारठ्याची काहीशी अनुभूती होत आहे. पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे हिवाळ्याचा आनंद घेत पुणेकर घराबाहेर पडत आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत. पुढील दोन दिवस शहरात पहाटे पहाटे धुक्याची चादर कायम राहू शकते. त्यात नाताळ दरम्यान शहर व परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. परिणामी येत्या गुरुवारपर्यंत (ता. २८) शहर आणि परिसरातील किमान तापमान १५ ते २० अंशांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.
राज्यात ही सध्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद औरंगाबाद येथे ११ अंश सेल्सिअस इतकी झाली. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३४.९ अंश सेल्सिअस होते. मध्य महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान १५ अंशांच्या खाली आहे. उत्तरेकडील राज्यात मात्र थंडीचा कडाका कायम आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान येथे थंडीच्या लाटेची स्थिती आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात चढ-उतार असाच कायम राहणार असून त्यानंतर राज्यातील किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी घट होऊ शकते. असे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.