
कृत्रिम झाडांवरील उधळपट्टीला ब्रेक; १८ लाखांची बचत
२१ डिसेंबर रोजी मुख्य अंकात पान ३ वर ॲंकर छापून आला आहे. त्या बातमीचे कात्रण वापरावे
---
पुणे, ता. २२ ः शहरात होणाऱ्या ‘जी २०’ बैठकांच्या निमित्ताने सुशोभीकरण व विद्युत रोषणाईच्या नावाखाली तब्बल २० लाख रुपये खर्च करून १०० कृत्रिम लायटिंगची झाडे लावली जाणार होती, पण उधळपट्टीवर नागरिकांनी कडाडून टीका केल्याने आता १०० कृत्रीम झाडे भाड्याने घेण्याऐवजी केवळ १० झाडे घेतली जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचे किमान १८ लाख रुपयांची बचत होणार आहे.
महाराष्ट्रात चार शहरांत ‘जी २०’ परिषदेअंतर्गत बैठका होणार आहेत. त्यापैकी पुण्यात तीन बैठका होणार आहेत. त्यातील पहिली बैठक १६ आणि १७ जानेवारी रोजी होणार असल्याने महापालिकेने तयारीसाठी कंबर कसली आहे. महापालिकेने त्यासाठी रस्ते डांबरीकरण, सुशोभीकरण करण्यावर भर दिला आहे. ६० चौकांचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकात विद्युत रोषणाई करण्याची जबाबदारी विद्युत विभागाकडे आहे. त्यामध्ये आठ दिवसांसाठी १०० कृत्रिम झाडे भाड्याने घेऊन ती विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर ठेवली जाणार होती. या प्रत्येक झाडासाठी सुमारे २० हजार रुपये भाडे महापालिका देणार होती पण या कृत्रिम झाडापेक्षा खऱ्या झाडांचे संवर्धन करा, पैशाची उधळपट्टी थांबवा अशी मागणी करत काही जणांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली. सोशल मिडियावरून महापालिकेच्या कामावर टीकेची झोड उठवली गेली. त्यामुळे आयुक्तांनी १०० ऐवजी काही मोजक्या ठिकाणी १० कृत्रिम झाडे लावा, इतर झाडे घेऊ नका असे आदेश विद्युत विभागाला दिले आहेत.
‘‘जी २०’ परिषदेनिमित्ताने १०० कृत्रिम लायटिंगची झाडे भाड्याने घेतली जाणार होती पण आता १० झाडे लावली जाणार आहे. आयुक्तांकडे याबाबत तक्रारी आल्याने हे आदेश दिले आहेत. या १० झाडांपैकी काही झाडे सीएसआरमधून बसविण्याचाही आमचा प्रयत्न आहे.’’
- श्रीनिवास कुंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग
‘‘पुणेकरांना भाकरी हवी आहे आणि महापालिका आम्हाला केक खायला देत आहे, अशी अवस्था सध्या आहे. पाहुणे येणार म्हणून सुशोभीकरणासाठी निधीची उधळपट्टी करण्यापेक्षा शहर कायमस्वरूपी सुंदर, स्वच्छ असले पाहिजे यासाठी महापालिकेने काम करावे. कृत्रिम झाडे, विद्युत रोषणाई करून त्यातून पुणेकरांना काहीही फायदा नाही.’’
- संजय शितोळे, नागरिक