मुक्ता टिळक अनंतात विलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्ता टिळक अनंतात विलीन
मुक्ता टिळक अनंतात विलीन

मुक्ता टिळक अनंतात विलीन

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : भाजपच्या आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांच्यावर शुक्रवारी (ता. २३) वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. या वेळी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुक्ता टिळक यांना कर्करोग झाल्याने त्या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. एकीकडे उपचार आणि दुसरीकडे राजकीय व सामाजिक कार्यातही त्या कार्यरत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी (ता. २२) दुपारी साडेतीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघासह इतर भागातील कार्यकर्त्यांनी टिळक वाड्याकडे धाव घेतली. तर काही जण रुग्णालयाकडे गेले. रात्री उशिराही टिळक वाड्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होती.
आज सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळक वाड्यात ठेवण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्यासह इतर पदाधिकारी अधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. कार्यकर्ते, मतदारसंघातील नागरिक, महिला यांनीही अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

केसरी वाडा ते वैकुंठ स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. वैकुंठ स्मशानभूमी येथे शासनातर्फे पालकमंत्री पाटील, जिल्हाधिकारी देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी पोलिसांनी बंदुकीतून तीन फैरी झाडत सलामी दिली. त्यानंतर टिळक कुटुंबीयांकडे तिरंगा सुपूर्द करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांना अश्रू अनावर
वैकुंठ स्मशानभूमीत चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ‘‘भीषण आजाराशी संघर्ष करताना मुक्ता टिळक यांचे निधन झाले. नगरसेवक, महापौर, आमदार म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले. लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सून म्हणून कार्य करताना लोकमान्यांचे विचार त्या स्वतः जगत आल्या. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संघटनेचा आदेश काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी व लक्ष्मण जगताप यांनी मतदान केले म्हणूनच भाजप निवडणूक जिंकू शकला,’’ असे सांगताना पाटील यांना अश्रू अनावर झाले. या वेळी परिसरात शांतता पसरली.