परीक्षांसंबंधी गांभिर्याने निर्णय घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षांसंबंधी गांभिर्याने निर्णय घ्या
परीक्षांसंबंधी गांभिर्याने निर्णय घ्या

परीक्षांसंबंधी गांभिर्याने निर्णय घ्या

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, त्याचा संपूर्ण करीअरवर दूरगामी परिणाम होतो. परीक्षेशी निगडित सर्वच घटकांनी अत्यंत गांभिर्याने यासंबंधी निर्णय घ्यावेत, असे आवाहन ‘सकाळ’च्या वाचकांनी विद्यापीठ प्रशासनासह महाविद्यालयांना केले आहे. शुक्रवारी (ता.२३) प्रसिद्ध झालेल्या ‘आता विद्यार्थ्यांची नव्हे, विद्यापीठाचीच परीक्षा’ या बातमीवर वाचकांसह विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. त्यातील निवडक प्रतिक्रियांचा आढावा...

संपूर्ण देशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव खूप आदराने घेतले जाते. पण दुर्दैवाने विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते आहे. परदेशातील विद्यापीठे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच संपूर्ण वर्षातील अभ्यासक्रमांचे, प्रात्यक्षिकांचे, परीक्षेचे व सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक देतात व त्याप्रमाणे पूर्ण करतात. आपली विद्यापीठ हे का करू शकत नाहीत.
- दीपक सावंत, नारायण पेठ

शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी मी काही उपाय सुचवत आहे. सर्वात प्रथम सुरू संपूर्ण शैक्षणिक वर्षाकरिता परीक्षेसाठी ७०ः३० सीबीएसई वार्षिक परीक्षा पॅटर्न राबवावा. तसेच प्रथम सत्राच्या संपूर्ण परीक्षा व मुल्यमापनाचे अधिकार महाविद्यालयांना द्यावे. मात्र पुढील सत्राच्या परीक्षा विद्यापीठाने योग्य वेळेत घेण्याचे नियोजन करून पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु करावे.
- एक वाचक

मी यांत्रिकी अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. प्रथमच मी परीक्षेसंबंधी एवढ्या अडचणींचा सामना करत आहे. विद्यापीठाकडून परीक्षेदरम्यान एक ते दोन दिवसांचा गॅप देण्यात येत होता. आता मात्र तो नाही.
- अभियांत्रिकीचा विद्यार्थी

मी एक पालक आहे. माझा मुलगा एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेत शेवटच्या वर्षाला आहे. आमच्या नात्यातले, स्नेही संबंधातील बरीच मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या खूप तक्रारी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा तिटकारा वाटावा इतकी वाईट स्थिती शिक्षणक्षेत्रातील लोकांनी तयार केली आहे.
- एक वाचक

विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलगुरू नसल्यामुळे आम्हाला याचा फारच मोठा फटका बसत आहे. सध्या आमच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र दोन पेपरमध्ये एक दिवसाचा गॅप दिलेला नाहीये. काही संघटनांच्या विरोधानंतर अभियांत्रिकीच्या वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा गॅप दिला. अन्य कोणत्याच शाखेच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळाला नाही.
- धनंजय गुंड, अभियांत्रिकीचा विद्यार्थी