
तरुणानो आता चला ‘एनडीए’च्या दिशेने!
पुणे, ता. २३ ः देश सेवेसाठी सशस्त्र दलात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि नेव्हल ॲकॅडमी (एनए) प्रवेशप्रक्रिये अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एनडीएची प्रवेश प्रक्रिया मुला-मुलींसाठी तर, नेव्हल ॲकॅडमीसाठी केवळ मुलांना अर्ज करता येणार आहे.
असे असेल टप्पे
खडकवासला येथील एनडीए या प्रशिक्षण संस्थेद्वारे सशस्त्र दलांना दर्जेदार अधिकारी पुरविण्यात येत आहे. यूपीएससीद्वारे एनडीए आणि नेव्हल ॲकॅडमीसाठी दरवर्षी दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तर आता एनडीएच्या १५१व्या अभ्यासक्रम आणि नेव्हल ॲकॅडमीच्या ११३व्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. लेखी परीक्षा, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) आणि वैद्यकीय चाचणी अशा टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या सर्व प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एनडीए आणि नेव्हल ॲकॅडमीमध्ये प्रवेश दिला जाईल.
अशा असेल राखीव जागा
१) एनडीएसाठी ः एनडीए प्रवेश प्रक्रिये अंतर्गत एकूण ३७० जागा रिक्त असून त्यातील मुलींना १९ तर मुलांना ३५१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सैन्यदल, नौदल आणि हवाईदल अशा तिन्ही दलांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्सचा समावेश असेल.
२) नेव्हल ॲकॅडमीसाठी ः नेव्हल ॲकॅडमीसाठी केवळ मुलांना प्रवेश दिला जाणार असून यामध्ये एकूण २५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- प्रवेश प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांसाठी ठराविक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आखण्यात आली आहे
- या प्रक्रियेत बारावी उत्तीर्ण झालेल्या तसेच बारावीमध्ये असलेल्या उमेदवारांना सहभाग घेता येईल
- वयोमर्यादा पाहता उमेदवारांचे वय हे साडेसोळा ते साडे एकोणीस वर्षे ठेवण्यात आली आहे
येथे करा अर्ज
एनडीए आणि नेव्हल ॲकॅडमीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना upsc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख ः १० जानेवारी २०२३
लेखी परीक्षा ः १६ एप्रिल २०२३
कोर्सची सुरवात ः २ जानेवारी २०२४
असा करा अर्ज
- यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
- अधिकृत संकेतस्थळाच्या होमपेजवर ‘ॲक्टिव्ह एक्झाम’ या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर ‘एनडीए आणि नेव्ह ॲकॅडमी - एक ऑनलाइन अर्ज’ हा पर्याय निवडा
- प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करा
- त्यात आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करणे
- संपूर्ण अर्ज भरल्यानंतर ‘सबमीट’वर क्लिक करा