
स्वारगेट स्टॅंडवर पिस्तुलाचा धाक दाखवून लूट
पुणे, ता. २३ : स्वारगेट एसटी स्टँड परिसरात अंडाभुर्जीचा व्यवसाय करणाऱ्याला एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी बंड्या थोरवे याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुणाल प्रभाकर कांबळे (वय २७, रा. कैलास भुवन, स्वारगेट) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अंडा भुर्जीची गाडी असून ते स्वारगेट एसटीस्टँड परिसरातील गेटजवळ व्यवसाय करतात. गुरुवारी (ता. २२) रात्री ते त्यांचा अंडाभुर्जीचा धंदा उरकून घरी निघालेले असताना तेथे त्यांच्या ओळखीचा असलेला बंड्या थोरवे आला. त्याने फिर्यादीला अंडा राइस मागितला असता तो फिर्यादी यांनी देण्यास नकार दिल्याने थोरवेने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादी कांबळे यांना धमकी दिली. तसेच अंडाभुर्जीच्या गाडीपासून बाजूला ढकलून गल्ल्यामधून दोन हजार ६०० रुपयांची रोख रक्कम चोरून पळून गेला.