‘सुरक्षारक्षक’ची निविदा रद्द करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सुरक्षारक्षक’ची निविदा रद्द करावी
‘सुरक्षारक्षक’ची निविदा रद्द करावी

‘सुरक्षारक्षक’ची निविदा रद्द करावी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः महापालिकेतील ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले, तर ही निविदा रद्द करून पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घ्यावेत. त्यामुळे कामगारांची पिळवणूक थांबेल, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे. तसेच अनेक नागरिकांनी ‘सकाळ’च्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महापालिकेतील ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामवरून कमी केले जाणार असल्याची तक्रार जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर मंडळाने महापालिकेला खरमरीत पत्र पाठवून कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका भवनासमोर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करा, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. नंदा लोणकर, प्रदीप देशमुख, प्रदीप गायकवाड, अशोक कांबळे, वनराज आंदेकर, नितीन कदम, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.
मंडळाकडून सुरक्षारक्षक घ्यावेत
या संदर्भात मनसेचे सरचिटणीस संभूस यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमताना जिल्हा मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घेतले पाहिजेत. खासगी ठेकेदार नेमून सुरक्षारक्षकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली जात आहे, शासनाचा निधी बुडत आहे. त्यामुळे निविदा रद्द करून मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घ्यावेत, अशी मागणी केली आहे.

माझे वय ४७ आहे, सुरक्षा रक्षक म्हणून आम्ही व्यवस्थित काम करू शकतो. तरीही आम्हाला कामावरून काढत आहेत. घरची परस्थिती आधीच नाजूक असताना आता कामावरून काढले तर मला दुसरीकडे कामावर कोण घेणार? त्यामुळे महापालिकेने हा नर्णय बदलावा.
- सुरक्षारक्षक महिला

कोरोना काळात सुरक्षारक्षकांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यांनाच आता वयाचे कारण दाखवून घरी बसवले जात असेल तर हे योग्य नाही. यापेक्षा ठेकेदाराने वेळेवर पगार द्यावेत.
- अभिषेक मदाळे, नागरिक

वय जास्त झाले म्हणून कंत्राटी कामगारांना कामावर येऊ नका, असे सांगणे योग्य नाही.
- विक्रम ससाणे

वय जास्त झाले म्हणून ४५ च्या पुढील सुरक्षारक्षकांना कामावर कमी करू, असे महापालिकेने सांगणे अयोग्य आहे.
- प्रशांत भंडारी

आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकणे हा एक मोठा धक्का आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकट आलेले असता आता नोकरी जाण्याने अनेक जण नैराश्‍यात जातील. कदाचित राजकीय लोकांच्या कार्यकर्त्यांना नोकरीवर लावण्यासाठी हा निर्णय घेतला असावा.
- योगेश पवार