
पुण्यातील प्रश्नांबाबत आवाज उठविणार
- आमदार माधुरी मिसाळ (भाजप) ः
शहरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन, रिंग रोडचे भूसंपादन, मेट्रोचे विस्तारित मार्ग आणि मेट्रो एफएसआयच्या प्रीमियमचा मुद्दा आदींबाबत लक्षवेधी मांडली आहे. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणी, समाविष्ट गावांचे प्रश्न आदींबाबतही मुद्दे उपस्थित करणार आहे.
- आमदार भीमराव तापकीर (भाजप) ः
महावितरणकडून वितरित होत असलेली चुकीची बिले, मेट्रोचे विस्तारित मार्ग, चैतन्यनगरमधील मैदानाचा प्रश्न, समाविष्ट ३४ गावांचा रखडलेला विकास आणि त्यासाठीचे एकत्रित नियोजन आदी मुद्दे मांडणार आहे. तसेच शिंदे बोगदा आणि नवले पूल दरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांचा मुद्दाही उपस्थित करणार आहे.
- आमदार सुनील कांबळे (भाजप) ः
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हुक्का पार्लरची संख्या वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शहर आणि परिसरातील व्यापाऱ्यांकडून माथाडींच्या नावाखाली खंडणी वसूल होत आहे, याबाबत लक्षवेधी मांडली आहे. शहराच्या मध्यभागातील वाहतूक कोंडीबाबत अनेक प्रश्न मांडणार आहे.
- आमदार सिद्धार्थ शिरोळे (भाजप) ः
शहर व परिसरातील कॅंटोन्मेंट बोर्डांना जीएसटीमधील निधीचा हिस्सा मिळावा, नदीतील प्रदूषण आणि जलपर्णीमुळे होणारा उपद्रव, खडकी परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी, अवैध धंदे या बाबतचे प्रश्न विधी मंडळात उपस्थित करणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांची मागणी करणार.