जातींचं विसर्जन केलं पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातींचं विसर्जन केलं पाहिजे
जातींचं विसर्जन केलं पाहिजे

जातींचं विसर्जन केलं पाहिजे

sakal_logo
By

संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची साम टीव्हीच्या महाराष्ट्र ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.....

प्रश्न- भांडारकर इन्स्टिट्यूटवरील हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड लोकांना माहीत झाली. तिथपासून दादोजी कोंडदेव आंदोलन, मराठा क्रांती मोर्चे ते अगदी अलीकडचे शाईफेक प्रकरण असा सगळा संभाजी ब्रिगेडचा प्रवास आहे. आत्तापर्यंतच्या आंदोलनातून काही मिळवलं असं वाटतं का ?
उत्तर ः संभाजी ब्रिगेड स्थापन झाली ती १९९७ मध्ये मराठा सेवा संघाच्या परिवाराचा भाग म्हणून. महात्मा फुलेंच्या सत्य विचारांच्या शोधांना संघटना मानते. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर कारवाई करण्याचा निर्णय ४ जानेवारी २००५ रोजी रात्री संभाजी ब्रिगेडने घेतला. त्याचं मुळ जेम्स लेनचं पुस्तक हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला. पुस्तकावर बंदीची मागणी झाली. पण काही होत नव्हतं. तिथं काही हिंसा झालेली नाही. आंदोलन केलं. ते ग्रंथालय आहे. प्राच्यविद्या संस्थेचं संशोधन मंडळ आहे. दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या संभाजी ब्रिगेड अतिरेकी संघटना, तालिबानी संघटना. त्यानंतर पी. ए. इनामदार यांनी ‘सकाळ’मध्ये लेख लिहिला आणि आम्हाला थोडीशी सहानुभूती मिळाली. लोकशाहीमध्ये न्याय मागणं सगळ्यांचा हक्क. पण न्याय मिळत नाही, तेव्हा संभाजी ब्रिगेडने भूमिका घेतल्या. साध्य निश्चित झालं; कारण जेम्स लेनच्या पुस्तकातला तो मजकूर वगळण्यात आला. पुस्तक आता उपलब्ध आहे. वाघ्याचा पुतळा बसवला; पण राम गणेश गडकरींचा नाही.

प्रश्न- संभाजी ब्रिगेड ब्राह्मण विरोधी आहे का?
उत्तर- महाराष्ट्रात महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधनाचा इतिहास मांडला. त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या वरातीत त्यांना हाकलण्यात आलं. तिथून फुलेंनी देशाच्या वैदिक धर्माचा अभ्यास केला. फुले जे मांडत होते ते शाहु महाराजांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात सत्य ठरलं. शाहू महाराजांसमोर भटजी पुराणोक्त म्हणत होता. त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी सांगितलं, की तुम्ही राजे आहात. तुम्हाला वेद मंत्राचा अधिकार आहे. त्यावर भटजी म्हणाले, तुम्ही शुद्र आहात. या वादात पुढे लोकमान्य टिळकही पडले. ते म्हणाले, तुम्ही शुद्र आहात असंच म्हणलं. आंबेडकरांनी शूद्र कोण होते लिहिलं. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद निर्माण झाला. हा कोणाच्या विरोधातला विचार नाही तर सत्यशोधनाचा विचार आहे. ब्राम्हण विरोधी हे सत्य नाही.

प्रश्न- संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीची ‘बी- टीम’ असल्याचा उल्लेख होतो.
उत्तर- मी राजकीय भूमिका घेतली त्याबद्दल मला लोकांची माफी मागायची आहे. संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष काढला. तो यशस्वी होईल, असं मला वाटलं नाही. म्हणून मी ‘शेकाप’मध्ये जायचं ठरवलं. पुढे आरक्षण आंदोलनावेळी मला कॉंग्रेसने तिकीट देऊ केलं. प्रवेश दिला; पण तिकीट मिळालं नाही.

प्रश्न- पण ज्या आरक्षण आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केला, आत्महत्या झाल्या. पण प्रश्न सुटला नाही!
उत्तर- २०१६ च्या मोर्चानंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली. लोकशाहीमध्ये संख्याशास्त्राला महत्त्व आहे. अपेक्षित न्याय मिळाला नाही आणि मग ठोक मोर्चे जन्माला आले. १४ हजार गुन्हे दाखल झाले आणि ४२ तरुणांनी आत्मबलिदान केलं. अण्णासाहेब पाटलांनी बलिदान केलं तसं बलिदान केलं. नैराश्याची सिमा झालेली आहे. नारायण राणे समितीने ईएसबीसी आरक्षण दिलं, जे उच्च न्यायालयात टिकलं नाही आणि फडणवीस सरकारने एसईबीसी दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं; पण सुप्रिम कोर्टात टिकलं नाही. आमची भूमिका मराठा महासंघाची आर्थिक निकषांवर आणि नंतर ओबीसी आरक्षणाची होती. महाराष्ट्र स्तरावर ओबीसी आयोगावर न्यायमुर्ती खत्री अध्यक्ष असताना दुरुस्ती केली कुणबी मराठामध्ये. त्यामुळे जुने कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळालं. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिलेलं आरक्षण मान्य झालं. त्यामुळे आरक्षणाचं आंदोलन गेली ४० वर्षे आपण चालवतोय, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. मंडल कमिशन आलं. १८० जाती होत्या. त्या २०० जाती झाल्या ओबीसीच्या. २१व्या शतकात जातीय मुद्दयावर आंदोलनं झाली, ती थांबवली पाहिजेत. त्यामुळे आम्ही एक नवी संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा ते म्हणाले होते अहद तंजावर तहद पेशावर. आता शिवाजी महाराज अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अशी प्रेरणा घेतील, असा विचार करून आम्ही ती मोहीम सुरु केली आहे. जगभरातल्या संधी शोधायला हव्या.

प्रश्न ः महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य केली जात आहेत. त्यात एक संभाजी ब्रिगेड सेनेच्या दावणीला तर दुसरी शांत आहे आणि राजे रस्त्यावर उतरले आहेत. हे चित्र नेमकं काय?
उत्तर- निश्चितच ज्यावेळी महापुरुषांची बदनामी होते आहे. आम्ही अनेक आक्रमक आंदोलनं केली. भांडारकरच्या वेळी ७२ लोक निर्दोष सुटले. पण ज्यावेळी ते सुटले, आम्ही निकाल घ्यायला गेलो, तेव्हा ७२ पैकी पाच तरुणांचं निधन झालं होतं. आम्ही त्यावेळी हत्तीवरून साखर वाटली, सन्मान केला. त्यावेळी कोणीही नेते लोक रस्त्यावर आले नाहीत. कार्यकर्त्यांच्या आर्थिक स्थितीचा मी अभ्यास केला. वय उमेद निघून गेली आहे आणि ४०-४५ ला आलेले माझे कार्यकर्ते आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना वेळेत दिशा दिली नाही तर त्यांचं आयुष्य वैफल्यग्रस्त होण्याची शक्यता आहे. हे सगळ्या सामाजिक चळवळींबाबत होते. जी शिवाजी महाराजांची बदनामी होतेय, ती झालीच नाही पाहिजे. पण, आता याची जाणीव छत्रपती घराण्यातल्या प्रतिनिधींना झाली आहे. छत्रपती उदयनराजे रस्त्यावर उतरले आहेत, युवराज संभाजीराजे नेतृत्व करत आहेत. यांच्यापुढे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे.

प्रश्न ः तुम्ही संभाजीराजेंना मुख्यमंत्री करणार होते. संभाजीराजे छत्रपती आज स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढताहेत आणि तुम्ही म्हणताहेत अस्मितांच्या राजकारणातून बाहेर पडा.
उत्तर- संभाजीराजेंना माझ्या शुभेच्छा. त्यांनी निश्चित एक दिवस मुख्यमंत्री व्हावं. परंतु राजकारणातलं बदललेलं अर्थकारण प्रचंड आहे. आता जिथं आर्थिक कुचंबणा प्रचंड आहे त्यांचं आर्थिक स्थैर्य सुधारणार नाही, तोवर राजकारण सुधारणार नाही. ज्या दिवशी माझे कार्यकर्ते आर्थिक सक्षम होतील, त्या दिवशी मला आनंद होईल. झालेल्या चुकांसाठी समाजाने मला माफ करावं इतकीच माझी अपेक्षा आहेत.

प्रश्न ः छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती हे ज्या भूमिका मांडत आहेत, त्या तुम्हाला मान्य नाही?
उत्तर- छत्रपती उदयनराजे आणि युवराज संभाजीराजे हे आमची प्रेरणा आहेत. आमचा त्यांचा पाठिंबा आहे. परंतु, राजकीय भूमिकेत आज दोघंही भाजपच्या जवळ आहेत. आणि संभाजी ब्रिगेड आणि भाजपची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्ही ते मान्य करू शकत नाही.

प्रश्न ः आज मराठा नेते आणि मतं भाजपकडे वळत आहेत?
उत्तर- सत्तेत राहण्याचं मराठा समाजाचं मॉडेल शिवकालापासून आहे. सत्तेत येण्यासाठी निवडून येणाऱ्या माणसाला पक्षात आणलं जातं आणि ज्याला तिथं सुरक्षित वाटतं, तिथे मराठा नेते जातात.

प्रश्न- ही सगळी खंत मनात आहे म्हणून आज संभाजी ब्रिगेडला नवी दिशा देण्याचा तुमचा प्रयत्न आहे का?
उत्तर- एकविसावं शतक आहे. लोकांना ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळत आहे. पण आता बेरोजगारी आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं, की आम्ही दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, ते होत नाही, नवे उद्योग येत नाहीत. म्हणून मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी. महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा तो प्रत्येकजण ही भूमिका घेउन आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहे. पैशाला, व्यापाराला जात नसते आणि ज्यावेळी आम्ही सिमा ओलांडायचा विचार करतोय, त्यावेळी जातींचं विसर्जन केलं पाहिजे. जातीअंताची लढाई लढण्याच्या बाजूचा मी आहे.