विशेष मुलांचा कलाविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांचा कलाविष्कार
विशेष मुलांचा कलाविष्कार

विशेष मुलांचा कलाविष्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः शारिरीक मर्यादांना विसरत उत्साहाने अभिनय करणाऱ्या विशेष मुलांचा कलाविष्कार पाहून नाट्यगृहातील प्रेक्षक स्तिमित झाले होते. आपल्या वाट्यास आलेली भूमिका चोख बजावण्याचे आणि अचूक संवादफेक करण्याचे त्यांचे प्रयत्न पाहून उपस्थित सगळेच भारावून गेले होते. निमित्त होते डॉ. नीलिमा देसाई करंडक नाट्य स्पर्धेचे.

नवक्षितिज संस्थेतर्फे डॉ. नीलिमा देसाई यांच्या स्मरणार्थ विशेष मुलांसाठी या नाट्यस्पर्धेचे आयोजन केले होते. भरत नाट्य मंदिरात रंगलेल्या या स्पर्धेत लहान गट आणि मोठ्या गटात पंधरा संघांनी सहभाग नोंदवला. मोबाईलचे दुष्परिणाम, समाजमाध्यमाचा अतिवापर, झाड आमचे मित्र, कचरा व्यवस्थापन, मुलांचे भावविश्व अशा विविध विषयांवर त्यांनी नाटके सादर केले. स्पर्धेच्या विजेत्यांना दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे डॉ. चंद्रशेखर देसाई, परीक्षक प्रकाश पारखी, माधुरी ओक, स्मिता शेट्टी आणि रोहिणी मोरे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात १,६५० दिव्यांग शाळा आहेत. अनेक विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण देण्यात यावे, हा प्राधान्यक्रम आहे. दिव्यांगांसाठी केअर टेकर आणि केअर गिव्हरची समाजात खूप आवश्यकता आहे. त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपिन सांगळे यांनी केले, तर स्मिता शेट्टी यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल ः
लहान गट -
प्रथम क्रमांक - संजीवनी विद्यालय, हडपसर - नाटक ः ‘ससा आणि कासव’
द्वितीय क्रमांक - कामायनी विद्यामंदिर, निगडी - नाटक ः ‘स्वप्न विकणारा माणूस’
तृतीय क्रमांक - झेप रेमेडीअल लर्निंग सेंटर, पुणे - नाटक ः ‘पर्यावरण वाचवा’

मोठा गट
प्रथम क्रमांक - जीवनज्योत कार्यशाळा - नाटक ः ‘फिटे अंधाराचे जाळे’
द्वितीय क्रमांक - नवक्षितिज कार्यशाळा - नाटक ः ‘भक्त प्रल्हाद’
उत्तेजनार्थ - माधवी ओगले व्यावसायिक शाळा - नाटक ः ‘प्रगतीशील गाव’