इमारतीवरून पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश लवकरच मित्रांबरोबर बागडू शकेल; वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारतीवरून पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश
लवकरच मित्रांबरोबर बागडू शकेल; वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास
इमारतीवरून पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश लवकरच मित्रांबरोबर बागडू शकेल; वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास

इमारतीवरून पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश लवकरच मित्रांबरोबर बागडू शकेल; वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या चार वर्षांच्या मुलाला वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. सुमारे २५ दिवसानंतर, ‘तो’ आता बरा झाला असून, काही आठवड्यांनंतर त्याला पुन्हा शाळेतील मित्रांबरोबर खेळता येईल, असा विश्वासही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला.

थोरला मुलगा शाळेतून परत आल्याने आई त्याला घेण्यासाठी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेली होती. त्याचवेळी चार वर्षांचा मुलगा खेळत पाचव्या मजल्याच्या बाल्कनीत गेला. तेथून बाहेर डोकावत असतानाच काही समजण्याच्या आतच त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. विजयकुमार गुट्टे आणि डॉ. राहुल केंद्रे हे त्या मुलाला घेऊन नगर रस्ता येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आले.
रुग्णालयाच्या नवजात व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणाले, ‘‘दोन्ही डॉक्टर व पालक जेव्हा या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. पडल्यामुळे त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. हाता-पायांसह जबड्यालादेखील मोठी दुखापत झाली होती. मात्र, खरे आव्हान हे त्याच्या फुफ्फुसात झालेला रक्तस्राव आणि मेंदूतील रक्ताची गुठळी हे होते. त्याला श्वास घेण्यात अडथळे निर्माण झाले होते.’’

बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर लाड म्हणाले, ‘‘बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पहिली गरज होती ती रक्तस्राव थांबविण्याची. त्यासाठी फुफ्फुसाच्या आजूबाजूला साठलेले द्रव व हवा बाहेर काढण्यात आली. त्यातून फुफ्फुस आणि हृदयावरील दाब कमी झाला. मेंदूवरील सूज कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणासाठी औषधे देण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस उपचारांना तो प्रतिसाद देत नव्हता, मात्र एका आठवड्यानंतर हाता-पायाची थोडीफार हालचाल सुरू झाली आणि प्रगती दिसून आली. दहाव्या दिवशी त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. त्याची प्रकृती स्थिरस्थावर व्हायला लागली, मात्र हाता-पायांवर अनेक ठिकाणी झालेल्या फ्रॅक्चर्स आणि जबड्याला झालेली दुखापत या सर्व गोष्टींवर उपचार करणे तितकेच महत्त्वाचे होते.’’

मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. पुष्कर गद्रे यांनी चेहरा व जबड्यावर झालेल्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी प्रक्रिया केली. बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र खेत्रे, डॉ. प्रतीक कटारिया, डॉ. विकास पाटील व डॉ. प्रिया लोखंडे, क्लिनिकल असिस्टंट डॉ. तुषार कोरात, डॉ. श्रीदत्त गणगे, डॉ. कविता गणगे याबरोबरच परिचारिका, ब्रदर्स आणि सहायक व कर्मचारी यांचा समावेश होता.