
खूनप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी
पुणे, ता. २६ : खून करणाऱ्या तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वडगाव न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला. विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर (वय २५), कैलास ऊर्फ कालू रघुनाथ वाल्हेकर (वय ३०) आणि रघुनाथ चंदू वाल्हेकर (वय ५५) अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत. हरिश्चंद्र पांडुरंग वाघमारे यांचा खून करण्यात आला होता. १० डिसेंबर २०१७ रोजी वाघमारे यांचा मृतदेह मळवली रेल्वे स्थानकावर धड व डोके वेगळे अशा स्थितीत आढळला होता. मृतदेहाच्या गळ्यात नायलॉनची दोरी गुंडाळली होती. या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्याचे किसन लोहकरे यांनी फिर्याद दिली होती. परंतु हे प्रकरण कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तपासात आरोपींनी खून केल्याचा कबुलीजबाब दिला होता. न्यायालयात सरकारी वकिलांतर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील ॲड. सुनील मोरे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.