पाणी मीटरअभावी योजना अ‘समान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी मीटरअभावी योजना अ‘समान’
पाणी मीटरअभावी योजना अ‘समान’

पाणी मीटरअभावी योजना अ‘समान’

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः समान पाणीपुरवठा योजनेचे काम सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक असताना आता पाणीमीटरच उपलब्ध नसल्याने जवळपास एक महिन्यापासून हे काम ठप्प झाले आहे. पाण्याच्या मीटरमध्ये बसविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक चीपचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुटवडा निर्माण झाला असल्याने महापालिकेला मीटर मिळण्यास उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र यामुळे योजनेच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

योजनेची सद्यःस्थिती
पुणे शहरातील असमान पाणीपुरवठ्यामुळे काही भागांत २४ तास पाणी, तर काही भागात वर्षभर पाणीटंचाई असते. शहराच्या सर्व भागात समान व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सुमारे २४५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सप्टेंबर २०२३ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. एकूण १२०० किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाणार असून, त्यापैकी आत्तापर्यंत ८०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर ४०० किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम बाकी आहे. शहरातील सोसायट्यांना ३ लाख १८ हजार मीटर बसविले जाणार असून, त्यापैकी आत्तापर्यंत १ लाख मीटर बसवून पूर्ण झाले आहेत. मीटर बसविण्याचे केवळ ३० टक्के काम पूर्ण झाल्याने उर्वरित नऊ महिन्यांत तब्बल २ लाख १८ हजार मीटर बसविणे आवश्‍यक आहेत. यासाठी प्रशासनाने रोज किमान दीड ते दोन हजार मीटर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले होते. पण हे उद्दिष्ट गाठणे अवघड असल्याचे स्पष्ट होत आहे.

या कारणांनी मीटर रखडले
- महापालिकेकडून ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक’ पाणी मीटर बसविण्यास सुरुवात झाली आहे.
- या मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असल्याने रीडिंग घेण्यापासून मीटर सुस्थितीत आहे की नाही, हे कळते.
- जगभरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, ई-वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात अशा चीपची मागणी वाढलेली आहे.
- पाणीमीटर तयार करणाऱ्या कंपनीलाही अशा चीपचा असमान पुरवठा होत आहे.
- चीप उपलब्ध होत नसल्याने परदेशातून मीटर आलेले नाहीत.

जगभरात इलेक्ट्रॉनिक चीपचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाण्याचे मीटर तयार करणाऱ्या कंपनीकडेही चीप उपलब्ध नसल्याने महापालिकेला मीटरचा पुरवठा झालेला नाही. सुमारे एका महिन्यापासून शहरात नवीन मीटर बसलेले नाहीत. कंपनीकडून मीटर उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील महिन्यात १० हजार मीटर उपलब्ध होतील. पण ही संख्या अपुरी आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

गतवर्षीच्या तुलनेत तुटवडा कमी
इलेक्ट्रॉनिक चीपच्या तुटवड्याबाबत ‘सकाळ’ने उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींकडे खातरजमा केली. गेल्या वर्षी वाहनांमधील डॅशबोर्ड, इलेक्ट्रॉनिक वाहने व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी लागणाऱ्या या चीपचा तुटवडा अधिक होता; पण या वर्षी ही स्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे. पण पाण्याच्या मीटरसाठी ज्या चीप लागतात, त्याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची स्थिती काय आहे, हे सांगता येणार नाही, असे उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले.


अशी आहे मीटरची कार्यप्रणाली
- मीटरचे आयुर्मान १० वर्षे
- तीन मीटर खोल पाण्यात मीटर सुरू राहणार
- प्रत्येक मीटरचे रीडिंग घेण्यासाठी सोसायटीमध्ये जाण्याची गरज नाही
- महापालिकेचे कर्मचारी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ३०० मीटर लांबून रीडिंग घेऊ शकतात.
- मीटर खराब झाला, काढून टाकला, याची माहिती प्रशासनाला तत्काळ मिळेल.

समान पाणीपुरवठा मीटरची सद्यःस्थिती
विभाग (पॅकेज क्रमांक)- उद्दिष्ट-सध्यस्थिती
पर्वती (१)- ५३०९६- १४४२७
भामा आसखेड (२)-६४७८८-२१२५७
वारजे (३)-८२१७४-२७६४५
लष्कर (४)-४९०४४-००
वडगाव (५)-६९५३९-३७४४७
एकूण-३१८६४१-१००७७७