मांजाचा वापर अन् विक्री करणाऱ्यांना शिक्षा करा नागरिकांची मागणी ः मानवासह पक्षी, प्राण्यांच्या जिवाला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजाचा वापर अन् विक्री करणाऱ्यांना शिक्षा करा

नागरिकांची मागणी ः मानवासह पक्षी, प्राण्यांच्या जिवाला धोका
मांजाचा वापर अन् विक्री करणाऱ्यांना शिक्षा करा नागरिकांची मागणी ः मानवासह पक्षी, प्राण्यांच्या जिवाला धोका

मांजाचा वापर अन् विक्री करणाऱ्यांना शिक्षा करा नागरिकांची मागणी ः मानवासह पक्षी, प्राण्यांच्या जिवाला धोका

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः मांजाची विक्री करणारे व त्याचा वापर करणाऱ्या दोघांनाही जबर दंड करावा. तसेच मांजामुळे मानवासह पक्षी, प्राण्यांच्या जिवाला धोका आहे, हे माहीत असूनही त्याची विक्री करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा द्यायला पाहिजे, तेव्हाच त्यांच्यावर जरब बसेल, असा संताप सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या प्रतिक्रीयांमधून व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींनी महापालिका व पोलिस प्रशासनाला धारेवर धरुन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलांसह तरुणांमध्येही पतंग उडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, पतंग उडविण्याचा आनंद घेतानाच तरुणांमध्ये पतंगाची स्पर्धा लागत असून त्यातून विरोधी स्पर्धकाचा पतंग कापण्यासाठी घातक मांजाचा वापर केला जात आहे. दौंड येथे ५ डिसेंबर २०२२ या दिवशी मांजाने गळा कापला गेल्याने पन्नालाल यादव यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन तरुणींचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दरवर्षी मांजामुळे हजारो पक्षी जखमी होत असल्याची सद्यःस्थिती आहे. त्यानंतरही आता घातक मांजाची सर्रासपणे बेकायदा विक्री सुरू असल्याच्या प्रकारावर ‘सकाळ’ने वृत्ताद्वारे प्रकाश टाकला. मांजाबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ५० हजार रुपये, तर मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्याला एक लाख रुपये दंड आकारला पाहिजे. तसेच एखाद्याचा जीव मांजामुळे गेल्यास संबंधितांना किमान १५ वर्षांचा कारावास झाला पाहिजे. तेव्हाच, त्यांच्याकडून मांजाचा वापर टाळला जाईल.
- शकील सॅण्डी.

मांजाबाबत नागरिकांनीही सतर्क राहीले पाहिजे. मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास त्याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यायला हवी. तरच कोणाचा तरी जीव वाचू शकेल.
- जयंत महाबोले, सहकारनगर

धोकादायक नायलॉन व चिनी बनावटीचा मांजा कसा व कोठून विक्रीस येतो? हे शोधून पोलिसांनी थेट मुळावर घाव घातला पाहिजे. तेव्हाच विक्रेते सुधारतील आणि घातक मांजा विक्री करण्याचे थांबवतील.
- रत्नाकर चांदेकर, सदाशिव पेठ

मांजाचा वापर करणाऱ्यांकडून ५ हजार रुपये दंड करावा. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर थेट ५० हजार किंवा एक लाख रुपये इतका दंड आकारावा. तसेच मांजा विक्री करणारा व खरेदी करणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल करावा.
- विराज

मलाही एकदा पायामध्ये मांजा अडकलेले कबुतराचे पिलू सापडले होते. तो मांजा कसाबसा काढला, त्या पिलाला पाणी पाजून सोडून दिले. एका मांजामुळे अशा कितीतरी पक्षी, प्राणी व माणसांवरही गंभीर दुखापतीची वेळ आली आहे.
- कीर्ती बिवलकर

‘सकाळ’मधील ‘मांजामुळे जिवाला घोर’ ही बातमी वाचली. त्यानंतर मी स्वतः एका मुलाकडील पतंग व मांजा काढून घेतला. मांजा जाळून टाकला, त्यानंतर पतंग त्या मुलाला परत देऊन साधा दोरा वापरण्यास त्यास सांगितले.
- ज्ञानेश्‍वर लडकत

भारतात दरवर्षी नायलॉन मांजामुळे असंख्य जीवघेण्या घटना घडतात. मांजामुळे अनेकदा नागरिकांचे जीव जातात, ते जखमी होतात. मकर संक्रांतीच्यावेळी ‘पतंग महोत्सव’ भरवून त्यामध्येही मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा प्रकारे मांजाचा
वापर व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
- अरविंद कोपर्डे