राज्य बालनाट्य स्पर्धा ३ जानेवारीपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य बालनाट्य स्पर्धा ३ जानेवारीपासून
राज्य बालनाट्य स्पर्धा ३ जानेवारीपासून

राज्य बालनाट्य स्पर्धा ३ जानेवारीपासून

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेला येत्या मंगळवारपासून (ता. ३ जानेवारी) सुरुवात होणार आहे. यंदा स्पर्धेला नाट्यसंस्थांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत तब्बल २७ संघांचे सादरीकरण पाहायला मिळेल.

सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी अकरा वाजता योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्थेच्या ‘सात फेटेवाला’ या बालनाट्याने प्राथमिक फेरीला सुरुवात होईल. तर, शुक्रवारी (ता. ६ जानेवारी) ‘आगम, पुणे’ या संस्थेच्या ‘बदला’ या बालनाट्याने फेरीचा समारोप होईल. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. पहिल्या दिवशी सहा बालनाट्यांचे, तर उर्वरित तिन्ही दिवशी प्रत्येकी सात नाटकांचे सादरीकरण होईल.

या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश आहे. तरी चिमुकल्यांच्या कलाविष्काराला दाद देत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक प्रेक्षकांनी नाट्यगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

स्पर्धेचे स्थळ बदलले

गेली काही वर्षे मराठी, हिंदी, बाल व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर या खासगी नाट्यगृहात आयोजित केली जात होती. मात्र, यंदा भरत नाट्य मंदिराच्या व्यवस्थापनाने वीजबिलात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. संचालकांच्या पत्रानंतरही दरवाढ मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धांचे स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला असून, आता बालनाट्य स्पर्धेची फेरी महापालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडेल.