
महापालकेची वॉट्सॲपसेवा विस्तारणार
पुणे, ता. २७ ः महापालिकेतर्फे व्हाटसअॅपच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ केली जाणार आहे. या सेवेद्वारे आत्तापर्यंत केवळ मिळकतकर आणि पाणीपट्टी भरता येत होती. मात्र आता विविध प्रकारचे दाखले, ना हरकत प्रमाणपत्र, अधिकाऱ्यांचे, विभागाचे संपर्क क्रमांक यासह इतर माहिती उपलब्ध होईल. पुढील आठ दिवसांत व्हाटसअॅपच्या चॅटबॉट प्रणालीचा विस्तार सुरू होईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
महापालिकेतर्फे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये किंवा मुख्य महापालिका भवनात विविध सेवा पुरविल्या जातात. अनेक नागरिकांना महापालिकेचे संकेतस्थळ हाताळणे अवघड जाते. त्यामुळे आता सर्व सेवा मोबाईलवर व्हाटसॲपवर देण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहेत. व्हाटसअॅप चॅटबॉटचा उपयोग करून नागरिकांना अधिक जलदगतीने आणि अगदी जगात कोठेही बसून महापालिकेशी संबंधित सेवा सुविधा एका क्लिकवर मिळते. यासाठी महापालिकेने ८८८८२५१००१ हा विशेष व्हाटअॅप क्रमांक सुरू केला आहे. सध्या या क्रमांकावरून मिळतकराची रक्कम भरणे, कराची पावती घेणे व मिळकतीची माहिती घेणे अशी सुविधा दिली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे ९७ हजार नागरिकांनी या प्रणालीचा वापर केला आहे. या क्रमांकावर सेवेचा विस्तार करण्यासाठी संगणक विभागाकडून चाचपणी सुरू आहे. त्यामध्ये जन्म मृत्यू दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, विविध विभागांची माहिती, तक्रार नोंदणी या सुविधा व्हाटॲपवरून सुरू केल्या जाणार आहेत. सध्या या प्रणालीची तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आली असून टेस्टिंग सुरू आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सर्व सुविधा व्हाटअॅपच्या चॅटबॉट प्रणालीवर उपलब्ध होतील, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.