रोटरीतर्फे संगीतोपचार कार्यक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीतर्फे संगीतोपचार कार्यक्रमाचे आयोजन
रोटरीतर्फे संगीतोपचार कार्यक्रमाचे आयोजन

रोटरीतर्फे संगीतोपचार कार्यक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

रोटरीतर्फे संगीतोपचार
कार्यक्रमाचे आयोजन

पुणे ः ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’तर्फे पं. शशांक कट्टी यांच्या ‘सूर संजीवन’ या संगीतोपचार विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संगीतोपचारावर गेल्या पंचवीस वर्षापासून काम करणारे पं. कट्टी यांनी त्याचा फायदा कसा होतो, ही बाब सतारवादन करून उलगडून दाखवली. तसेच त्यांनी संगीतोपचाराचा रोगांवर होणारा परिणाम विशद करून सांगितला. ‘संगीतोपचाराने आजार नक्कीच बरे होऊ शकतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी संगीतोपचार फायदेशीर आहेत,’ अशा प्रतिक्रिया उपस्थित श्रोत्यांनी दिल्या.

‘शंकर-जयकिशन’ संगीत महोत्सव उत्साहात
पुणे ः शंकर जयकिशन फाउंडेशन, अहमदाबाद एसजीएमएफ आणि श्रीविद्या एन्टरप्रायजेस यांच्यातर्फे आयोजित शंकर जयकिशन संगीत महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी मोहम्मद रफी यांनी शंकर-जयकिशन यांच्या संगीत नियोजनात विविध २५ नायकांसाठी गायलेली २५ गाणी सादर केली. राजकपूर, देवानंद ते धर्मेंद्र, जितेंद्र, सुनील दत्त आदी नायकांसाठी रफींनी गायलेली गाणी ऐकताना श्रोते तल्लीन झाले. मोहम्मद रफी यांचे अनेक किस्से व आठवणी निवेदक श्रीधर कुलकर्णी यांनी सांगत श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाची दृकश्राव्य रचना, त्यातील विविधता व प्रत्येक गीताचे वैशिष्ट्य शरद आढाव यांनी उलगडून दाखवले.

भास्करराव कर्वे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धा संपन्न
पुणे ः महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयातर्फे आयोजित ‘भास्करराव कर्वे स्मृती करंडक’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्‍घाटन व पारितोषिक वितरण संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी तसेच संजय कुलकर्णी, प्राचार्या वीणा खांदोडे यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. प्रतिमा करकरे व प्रा. मिलिंद शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘रंग उषेचे’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे ः लेखिका-कवयित्री व सांगली आकाशवाणी केंद्राच्या प्रथम निवेदिका उषा बढे यांच्या गीतांवर आधारित ‘रंग उषेचे’ हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नागरिक संघ व कविवर्य राजा बढे परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुनीता कुलकर्णी यांनी या गीतांना चाली लावून ती सादर केली. विलास पायगुडे, शिरीष कुलकर्णी यांनीही गीते सादर केली. पल्लवी जरीपटके यांनी तर तबल्यावर उत्कर्ष कुलकर्णी यांनी साथ दिली. अनुराधा भडभडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. याप्रसंगी माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाच्या मोना टिपणीस तसेच अलका बढे, लेखक विनोद पंचभाई आदी उपस्थित होते.

‘ताल नृत्य अकादमी’तर्फे अरंगेत्रम
पुणे ः ‘ताल नृत्य अकादमी’तर्फे गुरू प्रेरणा तुळजापूरकर यांच्या शिष्या गौरी कदम, तनया रेणुके, नूतन शिंदे, ऋतुजा जाधव यांचे अरंगेत्रम संपन्न झाले. याप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पारस दैठणकर तसेच एकता दैठणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन चैत्राली तुळजापूरकर व ऐश्वर्या बिरादार यांनी केले. यावेळी डॉ. पारस दैठणकर यांनी ‘मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.