
दस्तनोंदणी करताना पक्षकाराचे हित पाहणे गरजेचे : अॅड. गिरमे
पुणे, ता. २७ : ‘‘दस्तनोंदणी करताना वकीलांनी पक्षकाराचे हित, तसेच कायदेशीर पद्धतीने नोंदणी केली पाहिजे. जेणेकरून पक्षकारास भविष्यात अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,’’ असे मत ज्येष्ठ वकील अॅड. अमित गिरमे यांनी व्यक्त केले.
‘पुणे बार असोसिएशन’ (पीबीए) तर्फे ‘तुकडेजोड-तुकडेबंदी कायदा परिपत्रके व न्यायनिवाडा’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथील अशोका सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘पीबीए’चे अध्यक्ष पांडुरंग थोरवे उपस्थित होते.
अॅड. गिरमे म्हणाले, ‘‘तुकडेजोड-तुकडेबंदी कायदा नीट समजून घेणे गरजेचे आहे. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना बऱ्याचदा अडचणी निर्माण होतात, त्यावेळेस या कायद्याच्या तरतुदींचा उपयोग होतो. कायदा मुळापासून समजून घेणे आवश्यक आहे. शासनाकडून वेळोवेळी या कायद्याबाबतीत विविध निर्णय घेतले गेल्याचेही त्यांनी नमूद केले. या कायद्यातील तरतुदी वकील बांधवांना विस्तृतपणे समजाव्यात व त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात या हेतूने सदर व्याख्यानाचे आयोजन केल्याचे अॅड. थोरवे यांनी सांगितले.