
जमते त्याचा विचार करून उद्योग सुरू करा
पुणे, ता. २८ : ‘‘स्वत:ला काय भावते, काय जमते याचा विचार करून उद्योग सुरू करावा. आमच्या भागात अनेक उद्योग सुरू झाले असले तरी काही बंद पडले,’’ असे बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी येथे सांगितले.
संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाप्रसंगी आयोजित ‘आरक्षणाकडून अर्थकारणाकडे’ या विषयाच्या प्रश्न-उत्तरांच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘उद्योग करताना सजग असले पाहिजे. कोणत्याही उद्योगात अडथळे असले तरीही त्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवली पाहिजे. कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे कष्ट करण्याची सवय लागली आहे.’’
‘बीव्हीजी’ समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड ः आज आमची बीव्हीजी कंपनी विविध क्षेत्रात काम करत आहे. त्यासाठी चांगली टीम आहे. म्हणून चांगले काम होत आहे. आजकाल तुम्ही कोणतेही काम करा, पण मन लावून केले तर यश नक्की मिळते.
युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे ः सध्या देशात १०० स्टार्टअप उद्योग आहे, पण त्याची उलाढाल कमी असून परदेशात याउलट परिस्थिती आहे. त्यासाठी उद्योगात सातत्याने नावीन्यपूर्ण बदल गरजेचे आहेत. उद्योगात हिशोब महत्त्वाचा आहे. तो काटेकोरपणे केला पाहिजे.
सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे ः शेती ही व्यावसायिक पद्धतीने केली पाहिजे. सहकार म्हटले तर राजकारण बोलले जाते. पण शेतीत शाश्वती आणायची असेल तर संघटित होऊन शेती केली पाहिजे. हा व्यवसाय म्हणून पाहत असताना एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.
‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर ः वाडवडिलांनी ठेवलेला जमिनीचा ठेवा जपून ठेवायचा मुख्य उद्देश होता. पण त्यावर साखर किंवा दुग्धव्यवसाय करून शेतकऱ्यांना दिलासा देणे हा हेतू होता. पण कालांतराने जमीन विकसित करून चांगला व्यवसाय सुरू केला. ग्राहकांची बांधीलकी अनेक उद्योजक टाळतात, पण आम्ही ती कायमस्वरूपी जपली आहे.
अभिनेते निखिल चव्हाण ः नवयुवकांना दिशा देणारे कोणीच नाही. पण, आता संभाजी ब्रिगेड उतरले असून तरुणांना खऱ्याअर्थाने दिशा मिळेल. संधी अनेक आहेत, फक्त त्या ओळखता आल्या पाहिजे. म्हणून मी कला क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मोठ्या उद्योजकांनी नवीन लोकांचे स्वागत करून त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी दिशा ठेऊन काम केले पाहिजे.’’
मिटकॉन फोरमचे संचालक गणेश खामगळ ः स्टार्टअप नवा उद्योग नवा विचार घेऊन जात असताना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व काही बंद असेल तर सर्व काही एकसमान स्तरावर आहोत. त्यामुळे हा काळ उद्योग उभारण्यासाठी महत्त्वाचा आहे. कुठलीही सेवा देताना, घेताना आनंद वाटला तरच उद्योगामध्ये मोठे होऊ शकतो.