पुण्यात दुचाकी विक्रीवर बंधने हवीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात दुचाकी विक्रीवर बंधने हवीत
पुण्यात दुचाकी विक्रीवर बंधने हवीत

पुण्यात दुचाकी विक्रीवर बंधने हवीत

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः पुण्यात सुमारे चाळीस लाख दुचाकी आहेत तर केवळ आठ ते नऊ टक्के रस्ते आहेत. वाहनांच्या संख्येवर कोणतेच निर्बंध नाहीत. जो तो आपली गरज म्हणून वाहने घेत आहे. अशा स्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर होतो का, याचा विचार केला पाहिजे? जर होत नसेल तर मग मेट्रो, उड्डाणपूल यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च का करावा? असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुचाकीच्या विक्रीवर बंधने आली पाहिजेत, असे मत व्यक्त केले.

सहजीवन व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘नवं काहीतरी’ या विषयावर बुधवारी राज ठाकरे बोलत होते. पुण्यातील वाहनांची संख्या, वाहतूक विषयी बोलताना त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावरदेखील प्रश्न उपस्थित केला. शहरात किमान १५ टक्के रस्ते असायला हवे , मात्र पुण्यात केवळ आठ ते नऊ टक्केच रस्ते आहेत. दुचाकीच्या संख्येवर कोणतीच निर्बंध नाहीत. दुचाकीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना भारताला दुचाकीचे ‘डंपिंग ग्राउंड’ बनवायचे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

चांगल्या लोकांनी राजकारणात यावे

नव्या विचाराच्या तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. मी जेव्हा पक्ष स्थापन केला, त्यावेळी अनेक माणसे सोबत आली. नंतर ती गळाली. राजकारणात संयम ठेवला पाहिजे. राजकारण म्हणजे निवडणुकांना उभे राहणे नाही. राजकारण वाईट नाही. राजकारण तुमच्या भविष्याशी निगडित आहे. तेव्हा चांगल्या लोकांनी राजकारणात यावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज यांनी मारला कपाळावर हात

राज ठाकरे यांचे भाषण झाल्यावर श्रोत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरात एका श्रोत्याने ‘आता मुख्यमंत्री तुमचेच आहेत, कृपया भोंगे बंद करण्यासंदर्भात काही तरी करायला हवे’ असे सुचविले. ‘मुख्यमंत्री तुमचाच’ असे म्हटल्यावर राज ठाकरेंसह उपस्थित श्रोत्यांत हशा पिकला. त्या विधानावर राज ठाकरे यांनी कपाळावर हात मारला.