
‘मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे आमदार गरजेचे’
पुणे, ता. २९ ः नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाविषयी एक ही प्रश्न विचारण्यात आला नाही. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व. आमदार विनायकराव मेटेंच्या निधनानंतर हे प्रश्न देखील पोरके झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी विधान परिषदेतील कोणत्याही एका आमदाराचा राजीनामा घेऊन त्याजागी मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना आमदार करावे, अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पत्रकार परिषदेत केली.
आहेर या वेळी म्हणाले, ‘‘मेटेंनी सुमारे ३५ वर्षे मराठा आरक्षण आणि मुंबईतील समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तसेच इतर मुद्दे घेऊन लढा दिला. त्यांच्या निधनानंतर बहुजन समाजाप्रमाणेच मराठा आरक्षण व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची व राज्य चालवायचे प्रयत्न राजकीय नेत्यांद्वारे केले जात आहे. मात्र, त्यांच्या स्मारकाच्या विषयाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचे काम सर्वच पक्षांकडून सुरू असल्याचे दिसत आहे. अधिवेशनाच्या उर्वरित काळात तरी हे दोन्ही विषय सर्व पक्षीय आमदार मांडतील अशी अपेक्षा आहे. बहुजन समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी विधी मंडळात हक्काचा आमदार असणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. ज्योती मेटे यांना आमदार करण्याची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत.’’