
क्लोरिन पावडर खरेदी करण्यास मान्यता
पुणे,ता. २९ : विविध मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांत निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरिन डाय ऑक्साईड (सीएलओ२) पावडरचा पुरवठा करण्याच्या प्रत्येकी ४३ लाख ७७ हजार ३२४ रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे महापालिकेचे ९ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे पाणी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व केंद्रांवर क्लोरिन ड्राय ऑक्साईड पावडरचा वापर करण्यात येतो. सध्या ९ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामधून सरासरी ४३० ते ४५० एमएलडी मैलापाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अंदाजे १४० किलो क्लोरिन डाय-ऑक्साइड पावडरचा वापर करण्यात येतो. त्यासाठी महापालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात गिरिराज ट्रेडिंग कंपनी आणि एस. व्ही. एस. केमिकल कॉर्पोरेशन एलएलपी यांच्याकडून प्रत्येकी ४३ लाख ७७ हजार ३२४ रुपयांची पावडर घेण्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.