शिकाऊ परवान्याची चाचणी ‘इन कॅमेरा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकाऊ परवान्याची चाचणी ‘इन कॅमेरा’
शिकाऊ परवान्याची चाचणी ‘इन कॅमेरा’

शिकाऊ परवान्याची चाचणी ‘इन कॅमेरा’

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः वाहन चालकांना शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन) काढण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी अधिक पारदर्शक झाली आहे. कारण, पुणे आरटीओ कार्यालयाने उमेदवारांची चाचणी ‘इन कॅमेरा’ सुरु केली आहे. तसेच, ही चाचणी घरातूनही देता येईल. मात्र, आधार कार्डावरील फोटो व उमेदवाराचा चेहरा यात फरक जाणवल्यास संबंधित संगणकीय यंत्रणा चाचणी सुरु करणार नाही. यासाठी वेब कॅमेरा वापरला जाणार आहे. उमेदवारांना कोणी उत्तरे सांगण्याचा प्रयत्न केल्यास त्या आवाजाची नोंद होऊन त्या उमेदवाराचा अर्ज बाद होत आहे. त्यामुळे बाद उमेदवारांचे प्रमाण वाढत आहे.

गैरप्रकारांना आळा बसणार
राज्याच्या मोटार वाहन विभागाने वाहन चाचणी प्रणालीत पहिल्यांदाच ‘फेसलेस’ची सुविधा विकसित केली आहे. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना देण्यापूर्वी उमेदवारांची चाचणी घेण्यात येते. त्यासाठी पूर्वी केवळ ऑनलाइन १५ प्रश्नांची परीक्षा द्यावी लागत होती. आता यात बदल केला आहे. उमेदवारांना ही परीक्षा आता इन कॅमेरा द्यावी लागत आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल, अशी आशा परिवहन विभागाला आहे.


‘फेसलेस’चा फायदा काय?
आरटीओ कार्यालयात अनेकदा एजंट वा अन्य व्यक्ती आपल्या उमेदवारांना चाचणीत पास व्हावे, या करिता मदत करतात. तर अनेकदा एजंटचा माणूसच उमेदवाराच्या नावाने परीक्षा देतो. ‘फेसलेस’ सुविधेमुळे आधार कार्डावरील फोटो व उमेदवारांचा चेहरा यांच्यात साम्य आढळून आले तरच चाचणीची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे डमी उमेदवार येथे देता येणार नाही. याशिवाय, उमेदवारांच्या बाजूला किंवा पाठीमागे कोणी दुसरा व्यक्ती आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद केला जातो. त्यामुळे चाचणी अधिक पारदर्शक होण्यास मदत मिळत आहे.

पुणे आरटीओ

१५००
दररोज दिले जाणारे एकूण वाहन परवाने

७००
वाहन परवान्यासाठी अपॉइंटमेंट कोटा

१५
परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न


किती प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्यास उत्तीर्ण

५ मिनिटे
परीक्षेसाठी लागणारा वेळ

१५०
दररोज शिकाऊ परवाना देणे

चाचणी देताना काय काळजी घ्यावी?
१. वेब कॅमेरा सुरु ठेवावा
२. पुरेशा प्रमाणात वीज
३. इंटरनेट कनेक्शन
४. आजूबाजूला कोणताही आवाज नको.
५. शेजारी कोणतीही हालचाल नको.


तक्रारी वाढल्या :
१) ‘फेसलेस’ची सुविधा सुरु झाल्यावर काही दिवसांतच याविषयी तक्रारी वाढल्या आहेत. चाचणी सुरु असताना कोणाचा मोबाईल जरी वाजला तरी त्या आवाजाची नोंद होऊन संबंधित उमेदवाराला बाद केले जात आहे.


२) चाचणी दरम्यान उमेदवाराने मान जरी हलविली, तरीही त्याला बाद केले जाते. त्यामुळे फेसलेस चाचणीला विरोध होत आहे.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी फेसलेस चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे. परिणामी, बनावट उमेदवारांना चाप बसेल.
- डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे