सर्व्हर बिघाडाने पालिका कर्मचारी वैतागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व्हर बिघाडाने पालिका कर्मचारी वैतागले
सर्व्हर बिघाडाने पालिका कर्मचारी वैतागले

सर्व्हर बिघाडाने पालिका कर्मचारी वैतागले

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आधारबेस बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली खरी, मात्र सर्व्हर बंद असल्याने हजेरीच लागत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापालिका प्रशासनाने कार्यालयीन शिस्तीबाबत कडक धोरण अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. आता बायोमेट्रिक हजेरीला आधारकार्डही अनिवार्य केले आहे. बायोमेट्रिकमुळे कार्यालयात हजेरी लावताना व कामावरून घरी जाताना दोन्ही वेळेस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधारकार्डमधील शेवटचे आठ क्रमांक डायल करून अंगठा लावावा लागतो. तसेच कर्मचाऱ्यांकडून सुमारे १६० रुपये घेऊन खास स्मार्ट ओळखपत्रदेखील देण्यात आले आहे. सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी मशिन बसविण्यात आल्या आहेत. हजेरी झाली नाही तर वेतन कापण्याचे आदेशदेखील देण्यात आले होते. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरपणे घेतली आहे. परंतु या मशीन योग्यरित्या काम करत नाहीत. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर हजेरी लागत नाही. सर्व्हरमध्ये बिघाड असल्याचे संदेश मशिन दाखविते. त्यामुळे कर्मचारी वैतागले आहेत. महापालिका भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये हीच स्थिती आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांना शिस्त लागली, तर दुसरीकडे मशिन बिघडले, असे विचित्र महापालिकेत पाहवयास मिळत आहे.

‘आधार’च्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी आल्याने बायोमेट्रिक हजेरीला अडचणी येत आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन ही यंत्रणा पूर्ववत होईल.
- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका