जर्मन दाम्पत्याची भारतीय मातीशी नाळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जर्मन दाम्पत्याची भारतीय मातीशी नाळ!
जर्मन दाम्पत्याची भारतीय मातीशी नाळ!

जर्मन दाम्पत्याची भारतीय मातीशी नाळ!

sakal_logo
By

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० : भारतीय नागरिकत्व कशा पद्धतीने जगले पाहिजे, हे आपल्या कृतीतून एका जर्मन दांपत्याने दाखवून दिले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या झगमगाटातून निवृत्त झाल्यावर पुण्याजवळ ओसाड माळरानावर सुमारे १३ एकर जमिनीवर फुलवलेल्या शेतीतून त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग दाखवला आहे आणि त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

मायकल जॉन (वय ६७) आणि ऍन्जी (वय ५९) यांची ही कथा. जर्मन, इटली, फ्रान्समधील कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम केल्यानंतर मायकल पत्नी ऍन्जीसह २०१३ मध्ये पुण्यात आले. निसर्ग, विविधतेने दोघेही पुण्याच्या प्रेमात पडले. २०१७ मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. नियमित प्रक्रियेद्वारे त्यांना नागरिकत्व मिळेना. अखेर जर्मन दुतावासाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यावर मायकल आणि ऍन्जीन्जी यांना २०१९ मध्ये दहा वर्षासाठी भारतीय नागरिकत्व (रेसिडेंटशिप) मिळाले, मात्र त्यासाठी दहा कोटी रुपयांची गुंतवणूक आणि किमान २० लोकांना रोजगाराची अट होती. भारतावरील प्रेमापोटी ही त्यांनी अट स्वीकारली. समाजमाध्यमाद्वारे जगाशी आणि शेतकऱ्यांशी संपर्कात असलेल्या या दाम्पत्याशी ‘सकाळ’ने भोर तालुक्यातील नसरापूरजवळील कांबरे गावात जाऊन संवाद साधला, आणि त्यातून एक प्रेरणादायी कथा समोर आली.

३५ हजार झाडांची लागवड
कांबरे गावात या दांपत्याने सप्टेंबर २०१८ पासून टप्प्याटप्प्याने १३ एकर जमीन घेतली. त्यातील काही जमीन भाडेतत्त्वावर आहे. आता या जमिनीवर २४० प्रकारच्या ३५ हजार झाडांची लागवड केली आहे. याशिवाय २६ लोकांना रोजगारही दिला. कांबाफार्म प्रकल्पामुळे ८५ नागरिकांचे जीवन सुकर झाले. कर्मचारी, ग्रामस्थांशी ते हिंदी, मराठीत संवाद साधतात. शेती उत्पादन, प्रक्रियेसाठी त्यांनी ‘औबिंगो फार्म’ ही कंपनी स्थापन केली. यांची दोन मुले जर्मनीतच असून, ते अधून मधून आई-वडिलांना भेटायला येतात. ट्रॅक्टर, टेम्पो चालवण्यापासून अगदी गवंडी कामापर्यंतची सर्व कामे मायकल करतात.

प्रयत्न सर्वांगीण विकासाचा!
महामार्गापासून ८ किमीवरील या गावात पुरेसा वीजपुरवठा नव्हता. दाम्पत्याने नाउमेद न होता सौरऊर्जेची मदत घेतली. ४३ सोलर पॅनल बसवून विजेबाबत ते स्वयंपूर्ण झाले. सौरउर्जेवरच त्यांचे शेतीचे रोजचे काम होते. पाण्यासाठी त्यांनी तीन तळी बांधली. शेतजमीन विकत घेणे, त्याचे नियम, गुंतागुंत, प्रशासकीय यंत्रणा, वहिवाटीचा रस्ता आदी अनेक आव्हानांना ते सामोरे गेले. चार कंटेनरद्वारे त्यांनी शेतातच घर बांधले. या दाम्पत्याचा उद्देश लक्षात आल्यावर ग्रामस्थांनीही सहकार्याचा हात पुढे केला. स्थानिक प्रशासन, वन खाते आणि पोलिसांनीही त्यांना मदत केली.

शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असला तरी तो फायद्यात आणणे शक्य आहे. त्यातून शाश्वत विकासाचे एक मॉडेल समाजापुढे आणायचे आहे. काही गोष्टी ग्रामस्थांकडून शिकतो; तर काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
- मायकल जॉन

खडकाळ जमिनीवर ३५० ट्रक माती टाकून शेतजमीन तयार केली. सेंद्रिय पद्धतीने आंतरपीक घेता येते, हे त्यातून लक्षात आले. आमचे विविध प्रयोग सुरू असून, काही वर्षांतच उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.
- ऍन्जी जॉन

मायकल आणि ॲन्जी गावाशी एकरूप झाले आहेत. गणेशोत्सव, शिवजयंतीमध्येही ते सहभागी होतात. गावातील प्रश्‍न सोडवण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. गावातील महिला आणि युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मायकल बाबा आमचे आहेत.
- सागर शिंदे, सरपंच, कांबरे

मागितले २४ हजार, दिले १० लाख
मायकल यांची २०१५ पासून कांबरे गावात ये-जा सुरू होतील. त्या दरम्यान काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विकास कामांसाठी त्यांना २४ हजार रुपयांची देणगी मागितली. या दाम्पत्याने शाळेची पाहणी केली आणि १० लाखांहून अधिक रुपये खर्च करून चांगल्या दर्जाची दोन स्वच्छतागृहे उभारली. त्यावेळी या दाम्पत्याने श्रमदानही केले.

कुटुंबात सात श्वानही!
या दाम्पत्याला पिंपळे निलखमध्ये गर्भवती श्वान सापडले. त्यांनी त्या श्वानाला कांबरेमध्ये आणले. तिला आठ पिल्ले झाली. या पिल्लांनाही दाम्पत्याने स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळले. आता मोठी झालेली पिल्ले कुटुंबाचा एक भाग झाली आहेत. मात्र, तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने एका श्वानाला मारले. त्यामुळे हे दाम्पत्य दुःखी झाले होते.