
गझलकारांनी चिंतनशीलता वृद्धिंगत करावी : भारत सासणे
पुणे, ता. ३० : ‘‘गझल, कवितेच्या प्रांतात यश संपादन करण्यासाठी प्रसिद्धीच्या मागे न लागता नम्रपणे साधना, उपासना करावी, चिंतनशीलता वृद्धिंगत करावी. मनन-चिंतन वाढविल्यास गझलकाराला शब्द सापडतात, शब्दांच्या पलिकडे अर्थ गवसतो आणि अर्थापलिकडेही आशय सापडतो,’’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी केले.
मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री, गझलकार आणि शायर निरुपमा महाजन यांना सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. अभिनेते, दिग्दर्शक भाऊसाहेब पाटणकर यांचे नात जावई किरण यज्ञोपवीत, ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना महाजन म्हणाल्या, ‘‘कविता स्फुरली, निर्माण झाली पण त्या काव्याला आकार मिळाला तो सुहृदांमुळे. लिखाण संयत आणि लयबद्ध कसे असावे याचे मार्गदर्शन पुण्याच्या साहित्यवर्तुळातील ज्येष्ठांकडून मिळाले. लेखक-कवी यांचे स्वत:चे असे काहीच नसते. सृष्टीकर्त्याकडून मिळालेले रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे ते एक माध्यम असते.’’
भूषण कटककर आणि प्रभा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब पाटणकर यांच्या विषयीच्या आठवणींना ॲड. आडकर यांनी प्रास्ताविकात उजाळा दिला. सूत्रसंचालन अपर्णा डोळे यांनी केले तर आभार प्राजक्ता वेदपाठक यांनी मानले.