‘विजयस्तंभ अभिवादन’ची तयारी अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विजयस्तंभ अभिवादन’ची तयारी अंतिम टप्प्यात
‘विजयस्तंभ अभिवादन’ची तयारी अंतिम टप्प्यात

‘विजयस्तंभ अभिवादन’ची तयारी अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : कोरेगाव भीमा परिसरात पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पुण्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी शुक्रवारी (ता. ३०) विजयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला.

पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे आदी या वेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचा विचार करता त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्यावतीने औषधे, मास्क आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियोजनानुसार शनिवारपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’

पोलिस आयुक्त रितेशकुमार म्हणाले, ‘‘पोलिस दलाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राज्य राखीव दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आणि कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्याकडून परिसरात सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. विजयस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र तात्पुरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.