
नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज
पुणे, ता. ३० : आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेले रस्ते, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये करण्यात आलेले विविध कार्यक्रम, यातून नवीन वर्षाचे धमाकेदार स्वागत करण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांच्या निर्बंधांनतर नव्या वर्षाचे स्वागत पुणेकर मोकळेपणाने करत आहेत. त्यात नव्या वर्षाचा पहिलाच दिवस ‘रविवार’ असल्यामुळे अनेकांनी सहकुटुंब फिरायला जाणे, मित्रमंडळींसोबत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी नियोजित केला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल्स आणि रिसॉर्टबरोबरच जवळच्या पिकनिकसह धाब्यांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावर विशेष वर्दळ पाहायला मिळते आहे. तरुणाईकडून ३१ डिसेंबरची तयारी काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांचा जल्लोषाचा मूड पाहून अनेक हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये स्वागताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर अनेकजण सहकुटुंब विविध प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घेत असल्याने त्यादृष्टीने हॉटेल्सने विविध जिन्नसांचा आपल्या मेन्यूकार्डमध्ये अंतर्भाव केला आहे. कॅम्प परिसरातील ख्रिश्चन प्रार्थना स्थळांसह मॉल्स, हॉटेल्स आणि चौकांना विशेष विद्युत रोषणाई केली आहे.
---
फोटो ः १४९३५, ९३६