पुण्यात नववर्षाची सुरुवात थंडीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात नववर्षाची सुरुवात थंडीने
पुण्यात नववर्षाची सुरुवात थंडीने

पुण्यात नववर्षाची सुरुवात थंडीने

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः शहरातील सरासरी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असून, नववर्षाची सुरवातही थंडीने होणार आहे. पुढील आठवडाभर तरी शहरातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, तसेच कमाल तापमानात चढ उतार पाहायला मिळेल.
उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील काही भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पहाटे व रात्रीच्या वेळी गारठा कायम असेल, तर दुपारी निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका जाणवेल, तसेच कमाल तापमानही ३० अंशापेक्षा जास्त नोंदविले जाईल. शुक्रवारी शिवाजीनगर येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

राज्यातही गारठा वाढणार
पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली राज्यात शनिवारी (ता. ३१) थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील शाहझानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानसह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस गारठा वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारी (ता. ३०) निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात काहीशी घट झाल्याने पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता. गेले काही दिवस सातत्याने उन्हाचा चटका कायम आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या वरच आहे.