वाहनांची तोडफोड करीत नागरिकांवर कोयत्याने वार सिंहगड रस्ता पोलिसांकडून गुन्हेगारांचा पाठलाग करून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनांची तोडफोड करीत नागरिकांवर कोयत्याने वार

सिंहगड रस्ता पोलिसांकडून गुन्हेगारांचा पाठलाग करून अटक
वाहनांची तोडफोड करीत नागरिकांवर कोयत्याने वार सिंहगड रस्ता पोलिसांकडून गुन्हेगारांचा पाठलाग करून अटक

वाहनांची तोडफोड करीत नागरिकांवर कोयत्याने वार सिंहगड रस्ता पोलिसांकडून गुन्हेगारांचा पाठलाग करून अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः कोयत्याने दहशत निर्माण करण्याचा प्रकार थांबण्याची अद्याप चिन्हे नाहीत. बुधवारी (ता.२८) रात्रीच्या सुमारास आंबेगाव पठार परिसरातील दोघांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड करीत काही वाहनचालकांवर कोयत्याने वार केले. या घटनेत तिघेजण जखमी झाले. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्यांनी हातात कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथे पोचलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेत चांगला चोप दिला. या घटनेमुळे आंबेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले होते.

आंबेगाव पठार परिसरातील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरामध्ये बुधवारी रात्री दहाच्या सुमारास करण दळवी (रा. वडगाव) याच्यासह एका अल्पवयीन मुलाने हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केली. संबंधित परिसरातील खाऊ गल्लीमध्ये रात्री दहा वाजता दोघेजण हातात कोयते घेऊन आले. त्यांनी पहिल्यांदा रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकींवर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये घुसून ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला. तेथून काही अंतरावर जाऊन पुन्हा अथर्व लांडगे (वय २०) या विद्यार्थ्यावरही कोयत्याने वार केला. तर त्याचा मित्र तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर प्लॅस्टिकचा स्टूल फेकून मारला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, जवळच गस्त घालणारे सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस कर्मचारी अक्षय इंगवले व धनंजय पाटील या दोघांनी घटनास्थळी पोचले. त्यांनी त्यांचा पाठलाग करीत एकाला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. दरम्यान, दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व आर्म ऍक्‍टनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोयत्याने वार, तोडफोड, गोळीबार, गुन्हेगार सक्रिय
शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोयत्याने तोडफोड, जीवघेणे हल्ले करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर सातत्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात गोळीबाराच्याही घटना घडत आहेत. वाहनांची तोडफोड करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. सिंहगड रस्ता, कात्रज आंबेगाव, हडपसर, वानवडी यासह विविध भागात अशा घटना सातत्याने घडत असून गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान दिले जात आहे. असे असतानाही पोलिसांकडून गुन्हेगारांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याची सद्यःस्थिती असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
-----------