
राज्य बँकेत ८६ उमेदवारांना नेमणूक पत्रे तीस वर्षांनंतरील भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण
पुणे, ता. ३१ : राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये ३० वर्षांनंतर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली जात असून, त्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात ८६ उमेदवारांना नेमणुकीची पत्रे देण्यात आली. नववर्षाच्या आगमनालाच ही गोड बातमी मिळाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या भरती प्रक्रियेत २४२ जागांसाठी राज्यातून पाच हजार १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आयबीपीएस या बँकिंग क्षेत्रातील केंद्रीय संस्थेकडे लेखी परीक्षेचे आयोजन दिले होते. पारदर्शकपणे राबविल्या गेलेल्या प्रक्रियेत मुलाखती, ग्रुप डिस्कशन आदी चाचण्यांनंतर १३५ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत निवड झालेल्या ८६ उमेदवारांना आज नेमणुकीची पत्रे देण्यात आली. निवड करण्यात आलेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित असून, त्यामध्ये आठ उमेदवार बी.टेक, एम.टेक, ३१ उमेदवार स्थापत्य आणि संगणक अभियंता तर, १० उमेदवार कृषी पदवीधर आहेत. ‘‘हीच खरी बँकेची भविष्यातील मालमत्ता आहे,’’ अशी भावना बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली. तसेच, सहकारी बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्वांनीच पारदर्शी व गुणात्मक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य बँकेचा व्यवसाय ४७ हजार २७ कोटींवर
राज्य बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी बँकेची कर्मचारी संख्या एक हजार ८४२ इतकी होती. कर्मचारी निवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे कर्मचारी संख्या ६४३ इतकी झाली आहे. मात्र, प्रशासकाच्या नेमणुकीनंतर राज्य बँकेचा एकूण व्यवसाय २८ हजार ४१८ कोटींवरून ४७ हजार २७ कोटींपर्यंत वाढला आहे.