वनाज ते फुगेवाडीदरम्यान धावली मेट्रो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वनाज ते फुगेवाडीदरम्यान धावली मेट्रो
वनाज ते फुगेवाडीदरम्यान धावली मेट्रो

वनाज ते फुगेवाडीदरम्यान धावली मेट्रो

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः पुणे मेट्रो प्रशासनाने शनिवारी फुगेवाडी ते वनाज स्थानकादरम्यान मेट्रोची चाचणी घेतली. पुणे व पिंपरी चिंचवड ही दोन शहरे मेट्रोने एकमेकांना जोडणाऱ्या १५ किलोमीटरच्या या प्रवासाला ७० मिनिटे लागली. मात्र, जेव्हा प्रवासी सेवा सुरु होईल तेव्हा मेट्रोचा वेग देखील अधिक असेल. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी ४५ मिनिटांचा वेळ लागेल. जानेवारीत सेफ्टी कमिशनर या मार्गाची चाचणी करतील. त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हा मार्ग प्रवासी सेवेसाठी खुला होईल, असे ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे मेट्रोने फुगेवाडी (पिंपरी चिंचवड महापालिका हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे महापालिका हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाज (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर ट्रायल रन घेतली. सध्या पुणे मेट्रोचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोने नुकतेच गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि रेंजहिल स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक अशा चाचण्या पूर्ण केल्या. याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर आताच्या सेवेचे विस्तारीकरण केले जाईल.

अशी झाली चाचणी...
फुगेवाडी स्थानक येथून शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मेट्रो निघाली. दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल आणि शिवाजीनगर आदी स्थानकावरून सकाळी ११.१५ मिनिटांनी सिव्हिल कोर्टाच्या भूमिगत स्थानकात पोचली. यावेळी ४५ मिनिटे वेळ लागला. सिव्हिल कोर्ट स्थानकावरून इंटर चेंज करून दुसरी चाचणी सुरू केली. ११ वाजून २० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) येथून मेट्रो धावण्यास सुरवात झाली. ११ वाजून ४५ मिनिटांनी वनाज स्थानकावर पोचली. यासाठी २५ मिनिटांचा वेळ लागला. दोन्ही मार्गांचा विचार केला तर ७० मिनिटांत १५ किमीचे अंतर कापले.

... तर दिवसाला ५ लाख प्रवासी
पुणे मेट्रो जेव्हा पूर्ण क्षमतेने ३३ किमीवरच्या सर्व फेऱ्या सुरु करेल, तेव्हा एका दिवसांत सुमारे पाच लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे. येत्या दोन महिन्यांत गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकादरम्यान सेवा सुरू होऊ शकते तर जूनपर्यंत सर्व स्थानकांवर मेट्रोची सेवा सुरु होण्याची शक्यता मेट्रो प्रशासनाने व्यक्त केली.

फुगेवाडी ते वनाज स्थानकादरम्यान पहिल्यांदाच चाचणी झाली. मेट्रोने आता पिंपरी चिंचवड आणि पुणे जोडले जाणार आहे. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर लवकरच या मार्गावरून मेट्रो धावण्यास सुरवात करेल. येत्या काही दिवसांत वनाज ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असा थेट प्रवास करणे शक्य होईल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित,
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो