परीक्षेतील गैरप्रकार ः २०१८ मधील १,६६३ उमेदवारांवर कारवाई होणार ‘टीईटी’त कायमस्वरूपी बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षेतील गैरप्रकार ः २०१८ मधील १,६६३ उमेदवारांवर कारवाई होणार 
‘टीईटी’त कायमस्वरूपी बंदी
परीक्षेतील गैरप्रकार ः २०१८ मधील १,६६३ उमेदवारांवर कारवाई होणार ‘टीईटी’त कायमस्वरूपी बंदी

परीक्षेतील गैरप्रकार ः २०१८ मधील १,६६३ उमेदवारांवर कारवाई होणार ‘टीईटी’त कायमस्वरूपी बंदी

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : राज्यात २०१९ च्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारानंतर आता २०१८ मध्ये झालेल्या ‘टीईटी’त गैरप्रकार केलेल्या एक हजार ६६३ उमेदवारांची संपूर्ण संपादणूक रद्द करण्यात येणार आहे. तसेच यापुढे घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी या उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रस्तावित केले आहेत.
पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभाग, म्हाडा व टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणले होते. त्यात परीक्षा परिषदेतर्फे २०१९ मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणही उघडकीस आले होते. सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टीईटीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांची पडताळणी केली होती. त्यात २०१९ प्रमाणेच त्याआधी म्हणजेच २०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांचाही तपास करण्यात आला. पुणे शहर सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करण्यात आली. त्यात एक हजार ६६३ उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे उघड झाले. त्यात उमेदवार प्रत्यक्षात अपात्र असताना त्यांनी गैरप्रकार करून स्वत:स पात्र करून घेतल्याची माहिती समोर आली.
या परिपत्रकामध्ये ‘परिशिष्ट अ’मध्ये नमूद केलेल्या ७७९ उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असतानाही अंतरिम/अंतिम निकालात या उमेदवारांना पात्र जाहीर केले आहे. त्यांची परीक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याची कारवाई परिषदेने प्रस्तावित केली आहे. ‘परिशिष्ट ब’मध्ये नमूद केलेल्या ८८४ उमेदवार हे अंतरिम/अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेचे प्रमाणपत्र वितरित झालेले नाही. तरीही त्यांनी बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रक प्राप्त करून घेतले आहे किंवा ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. याही उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करून यापुढे होणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी करण्याची कारवाई परिषदेने प्रस्तावित केली आहे. २०१८च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या एक हजार ६६३ उमेदवारांच्या नावाची यादीही परीक्षा परिषदेने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

‘व्यापम’च्या निकालाचा आधार
मध्य प्रदेशातील व्यापम गैरव्यवहारातील निकालाचा ‘टीईटी’ प्रकरणात आधार घेण्यात आला आहे. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असतील आणि त्यामध्ये सहभागी उमेदवारांना वेगळे करता येत असल्यास अशा परीक्षा रद्द करू नयेत. संबंधित उमेदवारांचे निकाल वेगळे काढता आल्यास कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांचे निकाल रद्द करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार २०१८ च्या टीईटी परीक्षेमध्ये गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची संपादणूक रद्द करणे या आदेशाचे परिपत्रक परीक्षा परिषदेने शनिवारी काढले.