ओबीसी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी विद्यार्थ्यांना 
विविध शैक्षणिक सुविधा
ओबीसी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा

ओबीसी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) जेईई, नीट या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येते. हे प्रशिक्षण ऑनलाइन असून नऊ हजार विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे मोफत टॅबचे वाटप सुरू केले आहे. तसेच महाज्योतीच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत, असे महाज्योतीच्या संचालकांनी सांगितले.
महाज्योतीतर्फे राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता वर्षभरात होणाऱ्या परीक्षा वेळेत पार पडतील. यामुळे महाज्योतीने विविध योजना प्रभावी पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाज्योतीतर्फे देण्यात येणाऱ्या जेईई, नीट या परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील ८, ९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी सर्वांत जास्त ८९० विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्यातून नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.
ओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना मोफत विविध स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षणही दिले जात आहे. यूपीएससीच्या १५०० विद्यार्थ्यांना नवी दिल्लीत मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १२ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठीसुद्धा १५०० विद्यार्थ्यांना पुण्यात मोफत प्रशिक्षण देऊन विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच १०० ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी प्रतिविद्यार्थी वीस ते चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती देणारी योजना महाज्योतीने मंजूर केली असून, या वर्षी त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळणार नाही, परंतु बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते, अशा विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये निवासी व भोजन भत्ता विद्यावेतन देणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तत्काळ सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे राज्यातील एकूण १२, ७०० विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी महाज्योतीने १०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j23908 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..