
बालभारती-पौड रस्त्यांच्या कामामुळे फरक पडणार पर्यावरण तज्ज्ञांची भूमिका ः सजग नागरिक मंचच्या वतीने चर्चासत्र
पुणे, ता. ३ : ‘‘बालभारती पौड या प्रस्तावित रस्त्यामुळे केवळ १०० ते १५० मीटरचा फरक पडणार आहे. तसेच, वाहतूक कोंडी कमी होणार नाही आणि वाहन चालकांचे जास्त अंतर वाढणार नाही. त्यामुळे हा रस्ता होऊ नये,’’ अशी भूमिका पर्यावरण तज्ज्ञांनी रविवारी घेतली.
सजग नागरिक मंचच्या वतीने ‘बालभारती-पौड रस्ता : पुणेकरांच्या हितास तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या डॉ. सुषमा दाते, एसपीटीएम संस्थेचे हर्षद अभ्यंकर, माजी नगरसेवक उज्वल केसकर, मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी उपस्थित होते.
डॉ. दाते म्हणाल्या, ‘‘बालभारती पौड प्रस्तावित रस्त्यामुळे लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहन चालकांचे अंतर कमी होईल, असे सांगितले जात आहे. याबाबत महापालिकेने अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी बालभारती पौड प्रस्तावित रस्त्यामुळे फक्त १०० ते ५०० मीटरचा फरक पडणार आहे. तसेच, या रस्त्यामुळे दीड हजार झाडे तोडली जाणार आहेत. तसेच, त्याचा प्रदूषण व भूजल पातळीवर देखील परिणाम होणार आहे. हा रस्ता म्हणजे पुढील दहा वर्षापर्यंतचा पर्याय आहे. त्यामुळे टेकडी फोडली जाणार असून त्याचा पर्यावरणावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा रस्ता खरोखरच करणे गरजेचे आहे का.’’
अभ्यंकर म्हणाले, महापालिकेने नेमलेल्या संस्थेने सेनापती बापट (एसबी) रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अभ्यास केला. त्यावेळी या रस्त्यावरून येणारी बहुतांश वाहने ही बीएमसीसी, भांडारकर, प्रभात रस्त्यावरून जात असल्याचे दिसून येत आहेत. पौड फाट्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या खूपच कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे हा रस्ता खरोखरच गरजेचा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था समक्ष करण्याची गरज आहे. पण, विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर वीस वर्षापासून पीएमपीची सेवा वाढविण्यात आलेली नाही. इतर पर्याय न करता फक्त बालभारती पौड रस्ता करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.’’
केसकर म्हणाले, ‘‘पहिल्यापासून मी रस्त्याच्या बाजूने आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरून दिवसाला ५७ हजार वाहने जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान न करता या रस्त्याला पर्याय देता आला पाहिजे, अशी पहिल्यापासून माझी भूमिका आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24352 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..