
शिंदे सरकारने नोकरी भरती वेगाने करावी
पुणे, ता. ४ : शिंदे सरकारने विधिमंडळाचा विश्वास संपादन केला. तसाच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवावा. राज्यातील तरुण पिढी सरकारकडे मोठ्या आपेक्षेने बघत आहेत. त्यामुळे शिंदे सरकारने नोकरी भरती वेगाने करावी. तसेच राज्यसेवा २०२२ जाहिरातीमध्ये महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या वर्ग १ च्या पदांच्या सर्व रिक्त जागांचा समावेश करावा, अशी अपेक्षा राम चव्हाण याच्यासह इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
शासनाच्या विविध विभागांमध्ये सुमारे दोन लाख ४० हजार पदे रिक्त असल्याचे ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री सांगत होते. त्यामुळे आता नव्या सरकारने नोकरी भरती राबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. आरोग्य भरतीत मोठा गोंधळ झाल्याने अखेर ती भरती ठाकरे सरकारला रद्द करावी लागली. त्यामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आता पारदर्शक नोकर भरतीची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असे अश्विनी कदम या विद्यार्थिनीने सांगितले.
आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येला एक वर्षे झाले आहे. मागील सरकारने एमपीएससीच्या उमेदवारांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. १२ एप्रिल २०२२ ला शासनाने आदेश काढून एमपीएससी कक्षेतील शंभर टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे. मात्र, तरीही राज्यसेवा २०२२ ची जाहिरात फक्त १६१ जागांसाठी आली. जागा वाढविण्यासाठी सोशल मीडियावर ट्विटरवर # चला_महसूलला_जाग_आणूया ही मोहीम राबवत आंदोलन केले. तसेच विविध माध्यमातून मागणी केली आहे. आता या सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी प्रियांका शिंदे हिने केली आहे.
शासनाची वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पुन्हा महापोर्टल आणू नये. जिल्हा निवड मंडळ रद्द करावे आणि कोणत्याही खासगी कंपनीची नोकरी भरतीसाठी नेमू नये. या पदांची भरती एमपीएससीकडूनच करण्यात यावी.
- संकेत माने, विद्यार्थी
कोणत्याही सरकारने नोकर भरती प्रभावी पद्धतीने राबविली नाही. त्यामुळे नव्या सरकारने तरुणांचा विचार करावा. कोणताही गोंधळ न ठेवता स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना न्याय द्यावा.
- पूनम शेवते, विद्यार्थिनी
सरकारने नेमकी काय भूमिका घ्यायला हवी?
नोकरी भरती बाबत या नव्या सरकारे नेमकी काय भूमिका घ्यायला हवी. याबाबत आपल्याला काय वाटते? याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24438 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..