भज्यांचा बेत केला खरा बायकोपेक्षा बॉस बरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भज्यांचा बेत केला खरा
बायकोपेक्षा बॉस बरा!
भज्यांचा बेत केला खरा बायकोपेक्षा बॉस बरा!

भज्यांचा बेत केला खरा बायकोपेक्षा बॉस बरा!

sakal_logo
By

रिमझिम पावसाला सुरवात होताच, मनोजच्या मनातला मोरही थुईथुई नाचू लागला. ‘रिमझिम गिरे सावन...’ हे गाणं म्हणत गॅलरीत पडणारं पावसाचं पाणी तो ओंजळीत साठवू लागला.
‘‘अगं पाऊस पडतोय....’’ मनोजनं आनंदानं म्हटलं.
‘‘मग मी काय नाचू काय?’’ स्वरालीने भांडणाला भांड्यांच्या आवाजाची फोडणी देत म्हटले.
‘तुझा भाऊ इतका हुशार आहे, की तो ज्यो बायडेनचा किंवा मार्क झुकेरबर्गचा सल्लागारच हवा होता. नाईलाजानं तो महापालिकेच्या उंदीर नसबंदी विभागात काम करतोय. तिथंही तो उंदरांना शास्त्रीयदृष्ट्या कुरतायडायचं कसं, हे शिकवत असेल,’ असा टोमणा मनोजने मघाशी मारला होता. त्यामुळे मघापासून तिची धुसफूस सुरू होती. ‘माझा भाऊ तुमच्यापेक्षा शंभरपट चांगला आहे...’ ही कॅसेट लावूनही तिचा राग शांत झाला नव्हता.
‘‘अगं पाऊस पडतोय, मस्तपैकी कांदाभजी तळ. गॅलरीत बसून आपण दोघेही खात बसू. त्यानंतर गरमागरम चहाचे घुटके घेत बसू.’’ मनोजने म्हटले.
‘‘कांदाभजी? तुमचं डाइट सुरू आहे ना? शंभर किलो तुमचं वजन झालंय. चालताना फरशी हादरते, त्याचं भान ठेवा.’’ स्वरालीने टोमणा मारला.
‘एकावेळच्या कांदाभज्यांनी काय होतंय?’’ मनोजने आशा सोडली नाही.
‘‘बेसनपीठ आणि कांदेही संपलेत.’’ स्वरालीने म्हटले.
‘‘मी आता आणून देतो.’’ मनोजने असं म्हटल्यावर स्वरालीने गिरणीतून दळणाचा डबाही आणायला सांगितला. पावसात भिजत जाऊन त्याने या गोष्टी आणल्या.
‘‘अहो भजी तळणार कशात? गोडेतेलही संपलंय.’’ स्वरालीने म्हटले. ‘‘तुम्ही बाहेर जाणारच आहात तर माझे इस्त्रीचे ड्रेसही आणून द्या. चौकातील ‘स्नेहा लेडिज टेलर’मधून माझी साडी फॉल आणि पिकोला दिली आहे. तीही आणा.’’ स्वरालीने म्हटले. कांदाभज्यांच्या आशेने मनोजही तेही काम केले.
‘‘अहोऽऽऽ’’ स्वरालीने असं म्हणताच ‘‘सिलिंडरमध्ये गॅस आहे ना? का तोही संपलाय.’’ मनोजने विचारलं.
‘‘गॅस आहे हो. पण कांदाभजी तळणार कशात? कढई घासायची राहिली आहे. तेवढी घासून देता का प्लीज...’’ स्वरालीने असं म्हटल्यावर मनोजने तेही काम केले. मग तिने आणखी काही भांडी त्याच्याकडून प्रेमाने घासून घेतली.
‘‘आपण गॅलरीत कांदाभजी खाणार ना? मग तिथं अडगळ किती आहे. तेवढी साफ करून द्या ना...’’ स्वरालीने असं म्हटल्यावर मनोजने तेही काम केलं.
‘‘कांदाभजी खाताना आपलं लक्ष पंख्याकडंही जाणार. त्याच्यावर साचलेली धूळ पाहिल्यानंतर तुम्हाला भजी खावूशी वाटतील का? त्यामुळं आधी तुम्ही पंखे साफ करून द्या.’’ स्वरालीने आणखी एक काम त्याच्या गळ्यात मारलं.
तेही काम त्यानं केले. एवढे करेपर्यंत ऑफिसला जायची वेळ झाली. मग त्याने साहेबांनाच फोन केला.
‘‘साहेब, आज खूप जोराचा पाऊस पडतोय. मला घराबाहेर पडणंही अवघड झालंय. त्यामुळे आज मी ऑफिसला येऊ शकणार नाही.’’ त्यावर साहेब म्हणाले, ‘‘ठीक आहे. माझ्या हाताखाली काम करायचंय की बायकोच्या हाताखाली काम करायचंय, हे तुझं तूच ठरव.’’ हे ऐकून मनोज चपापला.
‘‘म्हणजे साहेब, तुम्हीही बायकोच्या हाताखाली काम करण्याऐवजी ऑफिसमध्ये आलाय ना? माझंही तसंच झालंय. मी ऑफिसला लगेच निघतो. तेवढं कॅंटिनवाल्याला गरमागरम भज्यांची ऑर्डर द्या.’’ असं म्हणून त्याने फोन ठेवला.
‘‘अहो, भजी करण्यासाठी आपल्याकडचं तिखट आणि मीठही संपलंय. तुम्हाला अळणी भजी चालतील का?’’ स्वरालीनं विचारलं.
‘‘अगं बॉसने मला ऑफिसला तातडीनं बोलावलंय. त्यामुळे अळणी भजी खाण्यासाठी तू तुझ्या लाडक्या भावाला म्हणजेच ज्यो बायोडेनच्या सल्लागाराला बोलव. समजा त्याने ती भजी खाल्ली तर उत्तमच नाहीतर त्याचे उंदीर तरी नक्की खातील.’’ असं म्हणत स्वरालीने फेकलेले लाटणे चुकवत मनोजने घराबाहेर धूम ठोकली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24682 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..