
वाहतूक कोंडीत जीव लागला टांगली
पुणे, ता. ५ : “आईला अचानक बोलता येईना. जीभ जड झाली. चक्कर आली. तातडीने जवळच्या डॉक्टरांना बोलावलं. ‘अर्धांगवायूचा झटका आलायं, जवळच्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा’ या डॉक्टरांच्या एका वाक्यात सगळं काही आलं. रुग्णवाहिका बोलविण्याचीही वाट पाहिली नाही. आईला गाडीत बसवलं आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दिशेने निघालो. सिंहगड रस्त्यावर हॉर्न वाजून बेजार झालो; पण, वाहतूक कोंडी सुटता सुटेना. एक-एक मिनीट वाया जात होता. मात्र, कोंडीतून मार्ग निघेना. जवळच्या दुचाकीस्वाराला परिस्थिती सांगितली. त्याला दया आली. त्याने पुढे जाऊन गाडीला वाट करून दिली...” हे सांगताना रवी कुलकर्णी यांच्या डोळ्यात पाणी दाटले.
नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतुकीची बेसुमार कोंडी होत आहे. त्यातील ही चित्तथरारक घटना. कुलकर्णी म्हणाले, “अवघ्या १० ते १५ मिनीट अंतरावरच्या रुग्णालयात पोचायला तासभर लागला. देवासारखा धावून आलेल्या दुचाकीस्वाराने मदत केली म्हणून रुग्णालयात पोचलो.”
या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने सिंहगड रस्त्यावरील डॉक्टरांशी संपर्क साधला. या रस्त्यावर रुग्णवाहिकेलाही पुढे जायला रस्ता मिळत नाही. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोचविण्याचे आव्हान वाढले असल्याचे निरीक्षण या डॉक्टरांनी नोंदविले.
डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते म्हणाले, “यापूर्वी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात सकाळी आणि संध्याकाळी रुग्ण सहजतेने येत होते. पार्किंगला जागा मिळत होती. पण, आता वाहतूक कोंडीमुळे रुग्णाला रुग्णालयात येण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यांना त्रास होतो. त्यामुळे संध्याकाळी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नऱ्हे येथे एका उद्योगात काम करणाऱ्या कामगाराच्या डोळ्याला मार लागला होता. पण, त्याला रुग्णालयात पोचायला वाहतूक कोंडीमुळे एक तास लागला. हे डोळ्याचे दुखणे होते, त्यामुळे त्यातून थेट जिवाला धोका नव्हता. पण, आपत्कालीन वैद्यकीय स्थितीत वेळेत रुग्णालयात पोचणे या वाहतूक कोंडीमुळे कठीण होते.”
पाटील हॉस्पिटलचे डॉ. लितीन पाटील म्हणाले, “वाहतूक कोंडीचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. वैद्यकीय सेवेतील त्याची तीव्रता अधिक आहे. कारण, रुग्णवाहिकेचा आवाज येत असला तरीही सगळी वाहने पटकन बाजूला होऊ शकत नाहीत. या वाहनांना बाजूला घेण्यासाठीही रस्त्याच्या कडेला जागा नसते.”
डॉ. रूपाली देशमुख म्हणाल्या, ‘‘या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली की, त्याला पर्यायी असलेल्या रस्त्यांवर वाहने वळतात. तेथेही गर्दी होते. त्यामुळे रुग्णालयात धाव घेणे अवघड होते.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24971 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..