आला रे आला... रंगकर्मींचा सण आला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आला रे आला... रंगकर्मींचा सण आला!
आला रे आला... रंगकर्मींचा सण आला!

आला रे आला... रंगकर्मींचा सण आला!

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः ‘अरे आवाज कोणाचा’... ‘अरे करंडक कोणाचा’... या घोषणा आता लवकरच दुमदुमणार आहेत. करंडक पटकावण्यासाठीची चढाओढ पुन्हा लवकरच रंगणार आहे. कारण, तरुण रंगकर्मींचा वर्षांतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजेच ‘पुरुषोत्तम करंडक’ लवकरच आयोजित होणार आहे. यंदाच्या पुरुषोत्तम करंडकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडणार आहे.

‘महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे’ या संस्थेतर्फे १९६३ पासून महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तरुण रंगकर्मींचा उत्फुल्ल कलाविष्कार पाहायला मिळणाऱ्या या स्पर्धेने मराठी रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेला मानाचे स्थान आहे. दरवर्षी विविध महाविद्यालये हा प्रतिष्ठेचा करंडक पटकावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धेच्या आयोजनात खंड पडला होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा जानेवारी महिन्यात स्पर्धेचे ५६ वे पर्व पार पडले होते. आता सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याने स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात स्पर्धेचे आयोजन केले आहे.

‘‘यंदा स्पर्धेची प्राथमिक फेरी १४ ते २९ ऑगस्ट दरम्यान सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात पार पडणार आहे. स्पर्धेच्या प्रवेश पत्रिका १४ व १५ जुलै रोजी शुक्रवार पेठेतील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. प्रवेश पत्रिका मिळण्यासाठी महाविद्यालयाच्या लेटरहेडवर प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का आणि महाविद्यालयाचा शिक्का यासह ‘चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे’ या नावाने अर्ज करणे आवश्यक आहे’’, अशी माहिती संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूर देसाई यांनी दिली.

पुरुषोत्तम करंडकाच्या तारखा जाहीर झाल्याने दीड महिना तयारीसाठी मिळाला आहे. गतविजेते असल्याने साहजिकच आमच्या संघाकडून अपेक्षा अधिक आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदा काय वेगळे करता येईल, याबाबत विचार करून आता तयारीला प्रारंभ होईल.
- शंतनू जोशी,
गतविजेत्या नाटकाचा दिग्दर्शक व अभिनेता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25007 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..