निवडणुक आयोगाच्या पत्रात गोलमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुक आयोगाच्या पत्रात गोलमाल
निवडणुक आयोगाच्या पत्रात गोलमाल

निवडणुक आयोगाच्या पत्रात गोलमाल

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १३ हा कायमच वादात राहिलेला आहे. आता याच प्रभागाशी संबंधित निवडणूक आयोगाच्या पत्र व्यवहारातील गोलमाल समोर आला आहे. प्रभागरचना अंतिम करताना राज्य निवडणूक आयोगाचे एकाच तारखेचे, एकाच जावक क्रमांकाचे दोन पत्र समोर आली आहेत. एका पत्रात प्रभाग क्रमांक १२ औंध बालेवाडी, प्रभाग क्रमांक १३ बाणेर-सुस-म्हाळुंगे मध्ये बदल केला असल्याचे नमूद केले आहे. तर दुसऱ्या पत्रात या दोन प्रभागांचा उल्लेखच नाही.
यावर माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे या तीन नगरसेवकांनी आक्षेप घेत या प्रभाग रचनेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. केसकर यांनी महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांची सुनावणी झाल्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे न्यायालयाने सांगितले होते. प्राधिकृत अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या समितीने हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन त्यांच्या शिफारसींचा अहवाल आयोगाला सादर केला. याचिकेवर सुनावणी होत असताना केसकर यांनी चोकलिंगम समितीच्या शिफारसींचा अहवाल मिळावा अशी मागणी न्यायालयात केली. त्यानुसार हा अहवाल मिळाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याबाबत महापालिकेस १२ मे रोजी दिलेल्या पत्राचीही प्रत देण्यात आली. एका पत्रात ३२ प्रभागांमध्ये बदल केल्याचे सांगितले होते. दुसऱ्या पत्रात एकूण ३० प्रभागांचे क्रमांक देण्यात आले आहेत असे महापालिकेला सांगितले आहे. ३० प्रभागांत बदलाचे पत्र केसकर यांना देण्यात आले, त्यामध्ये प्रभाग १२ आणि १३ याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. हे दोन्ही पत्र एकाच दिवशी, एकाच जावक क्रमांकाने पाठविले असून, त्यावर एकाच अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. त्यामुळे नेमके कोणते पत्र खरे याची शहानिशा होईपर्यंत महापालिकेच्या प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी अशी व आठ दिवसात याचे स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा राज्य विधीमंडळाकडे तक्रार केली जाईल, असा इशारा उज्ज्वल केसकर यांनी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन सांगितली जाईल असे सांगितले.

असा आला गोंधळ समोर
अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग १२ व १३ मध्ये बदल केले असल्याचे आम्ही आयोगाला निदर्शनास आणून दिले. त्यावेळी त्यांनी आम्ही हे बदल केले नाहीत, तर महापालिकेने केले असावेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत जाऊन याची खातरजमा केली असता आम्हाला मिळालेल्या पत्रात आणि महापालिकेकडील पत्रात गोंधळ असल्याचे समोर आले. आमच्या पत्रात या दोन्ही प्रभागांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे यात फसवणूक झाली असल्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी प्रशांत बधे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25077 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top