
आणीबाणी पेन्शन योजनेकडे लक्ष
पुणे, ता. ५ : कोरोनाच्या संकटाचे कारण देत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा अधिक कारावास भोगलेल्यांना देण्यात येत असलेली मासिक पेन्शन योजना महाविकास आघाडी सरकारकडून बंद करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली योजना पुन्हा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याचा प्रस्ताव २ जानेवारी २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. त्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये एका महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस पाच हजार रुपये मानधन दिले जात होते. तसेच एका महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन देण्यात येत होते.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात सुरू केलेली ही योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या महसुलात घट झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे कारण देत जुलै २०२० मध्ये ही योजना बंद केली. त्यामुळे आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणे बंद झाले. आता राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारभार पाहत आहे. त्यामुळे ही पेन्शन योजना पुन्हा सुरू होईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25079 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..